‘प्रॉस्पेक्टस’ @ पये एक हजार ?
‘अभाविप’ने शिक्षणमंत्र्यांसमोर मांडला विषय
पणजी : राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांकडून प्रवेश प्रक्रियेदरम्यान ‘प्रॉस्पेक्टस’च्या नावाखाली जी अनधिकृत शुल्क वसुली सुरू आहे, ती थांबविण्यासाठी आपण स्वत: पुढाकार घ्यावा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी काल सोमवारी मंत्रालयात डॉ. सावंत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांकडून प्रॉस्पेक्टसच्या नावाखाली जे भरमसाट शुल्क वसूल केले जाते, त्याविरोधात अभाविपने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.
या प्रक्रियेत सुटसुटीतपणा आणण्यासाठी अभाविपने शिक्षणमंत्री आणि शिक्षण संचालकांकडे दोन पर्याय सुचवले आहेत. पहिल्या पर्यायात जशी अनेक विद्यालये आपली माहिती पुस्तिका ऑनलाइन प्रसिद्ध करतात, त्याच धर्तीवर उच्च माध्यमिक विद्यालयांनी प्रॉस्पेक्टस पीडीएफ स्वरूपात वेबसाईटवर मोफत उपलब्ध करून द्यावे. तसेच, जर छपाईचा खर्च अनिवार्य असेल, तर कोणत्याही परिस्थितीत प्रॉस्पेक्टसची किंमत 100 रुपयांपेक्षा जास्त नसावी, असे सूचविले आहे.
दुसऱ्या पर्यायात ज्याप्रमाणे महाविद्यालये प्रवेशाच्यावेळी प्रॉस्पेक्टस मोफत देण्यावर भर देतात, तसेच धोरण उच्च माध्यमिक विद्यालयांनीही लागू करावे. शिक्षण विभागाने सरकारी निर्णय काढून प्रॉस्पेक्टससाठी जास्तीत जास्त 100 रुपयांची मर्यादा निश्चित करावी. छापील प्रती घेण्याची सक्ती न करता ऑनलाइन मोफत डाउनलोडची सुविधा द्यावी. ज्या शाळा जास्त शुल्क आकारतात त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. तसेच, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अशा प्रकारचे प्रॉस्पेक्टस जास्त शुल्क देऊन खरेदी केले आहेत, त्यांना ते पैसे परत करावेत, असे सुचविले आहे.
‘प्रॉस्पेक्टस’ नफा कमवण्याचे साधन नव्हे
अभाविप कोकण प्रांत सहमंत्री यश कंटक यांच्या म्हणण्यानुसार, काही विद्यालये मोफत माहिती पुस्तिका देतात, तर काही ठिकाणी 1000 रुपयांपर्यंत लूटमार केली जाते. असे करणे अन्यायकारक आहे. माहिती पुस्तिका हे नफा कमवण्याचे साधन नसून ती फक्त माहिती देणारी पुस्तिका आहे. एवढे शुल्क म्हणजे विद्यार्थ्यांचे नुकसान करणारे आहे. त्यामुळे हे शुल्क आकारणे बंद करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
-यश कंटक, अभाविप कोकण प्रांत सहमंत्री