दीड हजारहून अधिक पीएसआय नियुक्तीसाठी अर्थखात्याकडे प्रस्ताव
गृहमंत्री डॉ. परमेश्वर यांची विधानसभेत माहिती
बेळगाव : गृह खात्याकडून 1 हजार 600 पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्तीला मंजुरी मिळवण्यासाठी अर्थखात्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात शिमोग्याचे आमदार चन्नबसाप्पा यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. शिमोगा जिल्ह्यातील एकूण पोलीस स्थानके, या पोलीस स्थानकांमध्ये मंजूर पदे, रिक्त पदे आदींविषयी आमदार चन्नबसाप्पा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर डॉ. जी. परमेश्वर यांनी उत्तर दिले. यापूर्वीच्या सरकारमध्ये 545 पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्ती प्रक्रियेत गोंधळ होऊन ही प्रक्रियाच स्थगित झाली होती. सध्या 947 पोलीस उपनिरीक्षकांची पदे भरण्यात आली आहेत. नियुक्त उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शिमोगा जिल्ह्यातील 33 पोलीस स्थानकात रिक्त असलेल्या 42 पैकी 32 पोलीस उपनिरीक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत.
शिमोग्यात पोलीस आयुक्त कार्यालय
जिल्ह्यात 155 पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिमोग्यात पोलीस आयुक्त कार्यालय सुरू करावे, अशी मागणीही चन्नबसाप्पा यांनी केली. भविष्यात यासाठी आवश्यक निकष लक्षात घेऊन पोलीस आयुक्त कार्यालय सुरू करण्याचा विचार करू, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. याचवेळी सागरचे आमदार बेळूर गोपालकृष्ण यांनी सिगंदूर येथे पोलीस स्थानक सुरू करण्याची मागणी केली. सध्या त्या ठिकाणी पोलीस आऊटपोस्ट आहे, असे सांगत ही मागणी फेटाळली. पूल उभारल्यानंतर सिगंदूर चौंडेश्वरी देवीच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याकडे गृहमंत्र्यांचे लक्ष वेधताच भविष्यात पोलीस आऊटपोस्टचा दर्जा सुधारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.