स्मार्ट सिटी बससेवा महिनाभर मोफत देण्याचा प्रस्ताव
प्रवासी आकर्षणासाठी योजना विचाराधीन : सेवेची लोकप्रियता वाढविण्यात होणार मदत
पणजी : कदंब महामंडळाच्या माध्यमातून कार्यवाहीत आणलेली आणि अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली ‘स्मार्ट सिटी इलेक्ट्रिक बस सेवा’ अधिक लोकप्रिय करण्यासाठी पुढील महिनाभर ही सेवा मोफत चालविण्यात यावी, असा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. कदंब महामंडळातर्फे राजधानीत चालवल्या जाणाऱ्या या स्मार्ट सिटी इलेक्ट्रिक बसेसकडे अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने ही बससेवा किमान महिनाभर मोफत चालविण्याचा प्रस्ताव आहे. तसे झाल्यास या बसेसची खाजगी बसेसशी स्पर्धा लागणार आहे. इमेजीन पणजी स्मार्ट सिटी अंतर्गत कदंब महामंडळाच्या माध्यमातून गत जुलै महिन्यापासून राजधानीत ही इलेक्ट्रिक बससेवा प्रारंभ करण्यात आली आहे. त्याअंतर्गत राजधानीच्या सर्व अंतर्गत आणि महत्त्वाच्या भागांसह संपूर्ण शहरात विविध मार्गांवरुन या बसेसद्वारे सेवा देण्यात येत आहे. आतापर्यंत या सेवेने उल्लेखनीय कार्यक्षमता दाखवली असून प्रवाशांकडूनही प्रशंसा होत आहे.
चार लाखांपेक्षा जास्त प्रवाशांचा प्रवास
प्राप्त माहितीनुसार जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधित या बसेसनी तब्बल दोन लाख किमी पेक्षाही जास्त प्रवास केला असून चार लाखांपेक्षा जास्त प्रवाशांना सेवा दिली आहे. सध्या हा उपक्रम म्हणजे राजधानीतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अविभाज्य घटक बनला असून त्यावरूनच या सेवेचे यश आणि वाढती लोकप्रियता लक्षात येत आहे. ही सेवा यशस्वी होत असल्याचे दिसत असले तरी सध्या ही सेवा सायंकाळी 8.30 पर्यंतच उपलब्ध असते. त्यामुळे नंतर आलेल्या प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ही सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचाही विचार सरकारने चालविला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
खाजगी बसवाल्यांची मक्तेदारी संपणार
सध्या या सेवेसाठी प्रवाशांना मार्गाच्या अंतरानुसार 10 ते 25 ऊपये पर्यंत तिकीट आकारणी करण्यात येते. मात्र शहरात होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे वाया जाणारा वेळ यांचा विचार करता लोक आजही या बसमध्ये प्रवास करण्यास इच्छुक नसतात. अशावेळी प्रायोगिक तत्त्वावर किमान महिनाभर तरी ‘मोफत प्रवास सेवा’ दिल्यास प्रवाशांना वेगळा अनुभव घेता येईल व त्यानुसार भविष्यात याच सेवेला प्राधान्य मिळण्याची अपेक्षा आहे, असे स्मार्ट सिटीतील एका अधिकाऱ्याने सांगितले. या सेवेअंतर्गत राजधानीत सुमारे 50 इलेक्ट्रिक बसेसद्वारे प्रवासी सेवा देण्यात येत आहे. त्याशिवाय पूर्वीच्या खाजगी बसेसमधीलही काही बसेसना प्रवासी वाहतुकीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. हे खाजगी ऑपरेटर ईव्ही बसना अडथळा आणण्याचे प्रयत्न करतात. प्रवाशांनी ईव्ही ऐवजी त्यांच्या बसेस वापराव्या असा आग्रह धरतात, असे दिसून आले आहे. अशावेळी ईव्ही बसकडून महिनाभर ‘मोफत सेवा’ दिल्यास प्रवासी याच बसेसना पसंती देतील व खाजगी बसवाल्यांची मक्तेदारी आपसुकच संपुष्टात येईल, हा या संकल्पनेमागील उद्देश आहे.