डबल इंजिनच्या फेरीबोट आणण्याचा प्रस्ताव
नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती
पणजी : एकेरी (सिंगल) इंजिन असलेल्या जुन्या फेरीबोटी बदलून दुहेरी (डबल) इंजिनाच्या फेरीबोटी आणण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. फेरीबोट बंद पडण्याचे प्रकार टाळावेत म्हणून सदर उपाययोजना करण्याचा विचार चालू असून एक इंजिन बंद पडले तर दुसरे इंजिन चालू करुन फेरीबोट चालू ठेवता येईल, असे नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांचे म्हणणे आहे. त्यांनी सांगितले की, इंजिन बंद पडले की फेरीबोट बंद होते. ती बंद होऊ नये किंवा बंद पडली तरी दुसऱ्या इंजिनाच्या साहाय्याने ती चालू ठेवता येईल म्हणून डबल इंजिनाच्या फेरीबोटी गरजेच्या आहेत. कुंभारजुवे येथे अलिकडेच एक फेरीबोट अचानक बंद पडली तर चोडण धक्क्यावर एक फेरीबोट पाण्यात बुडाली.
त्यावर स्पष्टीकरण देताना फळदेसाई बोलत होते. पाण्यातील लाटांच्या तडाख्याने इंजिनावर मोठा ताण आला आणि इंजिनासह फेरीबोट भरकटली. पाऊस, वाऱ्याची स्थिती, नदीला आलेली भरती व लाटांचे तडाखे यामुळे फेरीबोट भरकटल्यानंतर ती नियंत्रणात आणताना देखील बरेच त्रास सोसावे लागले. इंजिनावर दबाव आल्याने ते तापले आणि बंद पडले. काही वेळाने इंजिन थंड झाले व पुन्हा सुरु झाल्यानंतर ती फेरीबोट नियंत्रणात आली. या प्रकरणाची दखल घेऊन त्यावर सुरक्षा उपाय म्हणून डबल इंजिनाच्या फेरीबोटी जलमार्गावर घालण्याचे प्रयोजन आहे. म्हणजे एक इंजिन बंद पडले तर दुसऱ्या इंजिनवर त्या चालवता येतील. सध्या तरी सर्व फेरीबोटी सक्षम असल्याचा आणि तशी प्रमाणपत्रे असल्याचा दावा त्यांनी केला.