गुंजी प्राथमिक मराठी शाळेसाठी नवीन वर्गखोल्या मंजूर करण्याचा प्रस्ताव
बीईओंची शाळेला भेट : बैठकीत विविध विषयांवर चर्चा
वार्ताहर/गुंजी
गुंजी येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा जवळजवळ 120 वर्षे जुनी झाली असल्याने सदर इमारत पाडून नवीन शाळा इमारत बांधण्याचा प्रस्ताव ग्राम पंचायत अध्यक्षा स्वाती गुरव आणि शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष तानाजी गोरल यांच्याकडून खानापूर क्षेत्र शिक्षणाधिकारी पी. रामाप्पा यांच्याकडे मांडण्यात आला. गेल्या वर्षभरापासून एसडीएमसी आणि शिक्षणप्रेमींकडून मोडकळीस आलेल्या शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी शिक्षणाधिकारी, आमदार, ग्राम पंचायत यांच्याकडे केली होती. त्यानंतर ग्राम पंचायत अध्यक्षा आणि सदस्य यांनी देखील बेळगाव विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची भेट घेऊन इतर समस्यांबरोबरच शाळेचीही समस्या मांडली होती. याची दखल घेत त्यांनी थेट खानापूर बीईओशी संपर्क साधून शाळेबद्दल माहिती विचारली होती. त्यामुळे सोमवारी खानापूर क्षेत्र शिक्षणाधिकारी व त्यांचे सहकारी गुंजी प्राथमिक शाळेला भेट देऊन शाळेची पाहणी केली. त्याचबरोबर शाळेची दुरवस्था पाहून तेथे उपस्थित असलेले गुंजी शाळेचे सीआरसी बी. ए. देसाई यांना याआधी या शाळेचा अहवाल का देण्यात आला नाही? असा जाब विचारला. विस्तृत चर्चेनंतर या ठिकाणी सहा वर्गखोल्या मंजूर करण्याचा प्रस्ताव मान्य करून सदर प्रस्तावाची प्रत वरिष्ठांकडे पाठवून पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन बिईओंनी दिले.
विज्ञान विषयाच्या शिक्षकाची नेमणूक करावी
गुंजी ग्राम पंचायत अध्यक्षा स्वाती गुरव यांनी शाळेच्या शैक्षणिक दर्जाबद्दल सविस्तर चर्चा केली. तसेच गेल्या दहा-बारा वर्षांपासून विज्ञान विषयांचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच या ठिकाणी त्वरित विज्ञान विषयाच्या शिक्षकाची नेमणूक करावी, अशी विनंती केली.
बीईओंची गुंजी हायस्कूलला भेट
येथील सरकारी मराठी माध्यमिक आरएमएसए शाळेलाही क्षेत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी अचानकपणे भेट दिली आणि शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्याचबरोबर दहावीच्या घसरलेल्या निकालाबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच त्यांनी अनुत्तीर्ण मुलांबद्दलही चर्चा करून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना येत्या परीक्षेत पुन्हा बसण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना मुख्याध्यापक उत्तुरकर यांना केली. यावेळी खानापूर बीआयइआरटी एस. एन. कम्मार, संतोष नाईक, बीसी प्रौढ विभाग, सीआरसी बी. ए. देसाई, गुंजी ग्राम पंचायत अध्यक्षा स्वाती गुरव, उपाध्यक्ष अमोल बेळगावकर, एसडीएमसी व मुख्याध्यापक उपस्थित होते.