For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅन्टोन्मेंटच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव पुन्हा बारगळला

07:21 AM Jul 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
कॅन्टोन्मेंटच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव पुन्हा बारगळला
Advertisement

राज्य सरकारने थेट संरक्षण मंत्रालयाकडे विषय मांडण्याची सूचना

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमधील दुसऱ्या टप्प्यातील हस्तांतरणाचा प्रस्ताव पुन्हा एकदा बारगळला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डने या प्रस्तावावर पुन्हा नव्याने चर्चा करण्यास असमर्थता दर्शविली असून कर्नाटक सरकारने थेट संरक्षण मंत्रालयाकडे हा प्र्रस्ताव मांडावा, अशी भूमिका नुकत्याच झालेल्या कॅन्टोन्मेंटच्या बैठकीमध्ये घेतली.

Advertisement

पहिल्या टप्प्यात 112.687 एकर क्षेत्राच्या हस्तांतरणाला पहिल्या टप्प्यात मंजुरी देण्यात आली होती. परंतु उर्वरित 643.63 एकर क्षेत्राचा विषय प्रलंबित होता. 17 जुलै रोजी झालेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार सीईओ सुदाम मंचलवार यांनी बैठकीत स्पष्ट केले की, बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून 6 जुलै 2026 रोजी एक पत्र आले आहे. या पत्रात उर्वरित 643.63 एकर जमीन हस्तांतरणाबाबत कॅन्टोन्मेंट बैठकीत चर्चा घडविण्याची विनंती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या चर्चेनंतर कॅन्टोन्मेंटने डायरेक्टोरेट जनरल डिफेंस इस्टेट (डीजीडीई) च्या 28 जून 2024 रोजीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार निर्णय घेण्यात आला आहे. 6 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये 112.687 एकर क्षेत्राच्या पहिल्या टप्प्यातील हस्तांतरणाला मंजुरी देण्यात आली असून त्याबाबतच अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडे यापूर्वीच पाठविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

कॅन्टोन्मेंटने इतिवृत्तामध्ये असे नमूद केले आहे की, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर अंतिम मोहोर लावण्याचा अधिकार हा संरक्षण मंत्रालयाला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटकडून अभिप्राय मागविण्याऐवजी थेट कर्नाटक सरकारने हा विषय संरक्षण मंत्रालयाकडे मांडावा, असे निश्चित करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.