Kolhapur news | नागदेववाडीत बंद घर फोडून २.५० लाखांचा ऐवज लंपास
कोल्हापुरात पुन्हा घरफोडी; दत्तनगरमध्ये मोठी चोरी
नागदेववाडी- यात्रेसाठी गावी गेलेल्या कुटुंबाचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यानी साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने, रोख ५ हजार, चांदीच्या वस्तू असा सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. नागदेववाडी येथील दत्तनगर अर्चना पार्क (ता. करवीर) येथे १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली. याबाबतची फिर्याद सनी रमेश बासुदेव यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली.
सनी वासुदेव कलरच्या दुकानात काम करतात. सोमवारी (१६) रोजी कुरुंदवाड येथे यात्रेसाठी गेले होते. दोन दिवसानंतर बुधवारी सायंकाळी ते कोल्हापूरला परतले असता त्यांना घराचा मुख्य दरवाजाचा कड़ी कोयंडा उचकटल्याचे दिसून आले. आत जाऊन पाहिले असता एका बेडरुममधील लाकडी कपाटातील दागिने तसेच दुसऱ्या बेडरुममधील तिजोरीमधील दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती बासुदेव यांनी करवीर पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे करत आहेत.
वासुदेव यांच्या घरातून २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, सोन्याचे लॉकेट, चांदीची लक्ष्मीची मूर्ती, जोडवी २, तसेच रोख ५ हजार रुपये रोख असा सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले.