Kolhapur Crime News | बंद घर फोडून लाखांचा ऐवज लंपास; वडगाव परिसरात खळबळ
वडगाव -वठार तर्फे वडगाव परिसरातील अशोकनगर येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख १८ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चेतन मारुती कांबळे (वय ३५, रा. वठार तर्फ वडगाव ता. हातकणंगले) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 305(A)(B) व 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २२ जून २०२६ रोजी रात्री ११.३० ते २३ जून रोजी पहाटे ४.३० या कालावधीत ही घरफोडी झाली. चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाज्याची कडी-कोयंडा उचकून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याची चेन, काळ्या मण्यांचे दागिने, लहान मुलीची सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण तसेच रोख रक्कमेचा समावेश असून त्याची एकूण किंमत १,१८,२०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ २१३६ शेटे करीत असून वडगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.