For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेंगळुरात मालमत्ता कर थकविणाऱ्यांना दणका

10:48 AM Mar 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेंगळुरात मालमत्ता कर थकविणाऱ्यांना दणका
Advertisement

कठोर कारवाई : ‘जीबीए’च्या नगरपालिकांकडून मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू

Advertisement

बेंगळूर : मालमत्ता कर थकविलेल्यांविरुद्ध  ग्रेटर बेंगळूर प्राधिकरणातील (जीबीए) नगरपालिकांनी कठोर पाऊल उचलले आहे. बेंगळूर दक्षिण, बेंगळूर पश्चिम आणि बेंगळूर पूर्व नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात अनुक्रमे 52, 55 व 51 मालमत्ता निश्चित केल्या असून कर थकविलेल्या एकूण 158 मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कर थकविणाऱ्यांना कर भरण्यासाठी अनेक वेळा संधी देऊन सुद्धा प्रतिसाद न दिल्याने नगरपालिकांनी हा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेकदा सूचना देऊन सुद्धा थकीत कर न भरलेल्या मालमत्ता खरेदी केल्या जातील. लिलावासाठी कोणीही पुढे न आल्याने निश्चित किमान किमतीत (मार्गदर्शक मूल्यावर आधारे) मालमत्ता खरेदी करण्यासाठी नगरपालिका स्वत: पुढे आल्या आहेत.

कर थकविणाऱ्यांना अनेक वेळा नोटिसा, मालमत्ता जप्तीचे इशारे आणि सार्वजनिक लिलावाच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने हे अंतिम पाऊल उचलण्यात आले आहे. या मालमत्ता खरेदी केल्यानंतर थकीत कर, दंड, व्याज व प्रशासकीय खर्च वजा करून उर्वरित मूळ रक्कम मालकांना परत केली जाईल. त्यानंतर मालमत्तांची मालकी पूर्णपणे नगरपालिकांकडे हस्तांतरित होईल. त्यानुसार कागदपत्रेही अद्ययावत केली जातील. दरम्यान, कर थकबाकीदारांना आणखी एक संधी देण्यासाठी बेंगळूरमधील नगरपालिकांनी महिन्याची मुदत दिली आहे. या कालावधीत थकीत कर भरल्यास मालमत्ता स्वाधीन प्रक्रिया मागे घेऊन मालमत्ता परत केली जाईल.

Advertisement

Advertisement
Tags :

.