ड्रोनच्या साह्याने मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण
सांगली :
सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वतीने अत्याधुनिक ड्रोनच्या माध्यमातून शहरातील नवीन, वाढीव आणि वापरात बदल झालेल्या अशा सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण झाले आहे. या सर्वेक्षणामुळे मालमत्तांची अचूक माहिती आणि करयोग्य मूल्य निश्चित केले जाणार आहे अशी माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली. सर्वेक्षणामध्ये नव्याने आढळणाऱ्या मालमत्तांसाठी पालिकेच्या वतीने कर आकारणीची कार्यपध्दती जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत इमारत व जमिनीवर मालमत्ता कराची आकारणी व वसुली कार्यवाही करण्यात येते. त्यानुसार शहरातील कर कक्षेत नसलेल्या मालमत्तांना कर कक्षेत आणण्यासाठी महापालिकेने ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात नविन, वाढीव, वापरात बदल अशा मालमत्ता आढळल्या आहेत. या मालमत्तासाठी कर आकारणीची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. आढळलेल्या इमारत, मोकळया जमीन यांना सुलभ व सलग क्रमांक देण्यात आले आहेत. सवं मालमत्तांचे बिनचूक मोजमाप करणेत आले आहे. मालमत्तांचे आकारणी करीता फक्त चटई क्षेत्र कारपेट घेण्यात आला आहे. मालमत्तेची मोजमापे चौरस मीटर पद्धतीने करणेत आली आहेत. कर आकारणीसाठी मालमत्तेचा बांधकाम दर्जा, वापर, क्षेत्रफळ व इमारतीचे वय विचारात घेण्यात आले आहे. मालमत्ता अधिकृत किंवा अनधिकृत याचीही माहिती घेतली आहे. सामान्य करातील सवलतीच्या माहितीचे संकलन, मालमत्तांची विवरणपत्रात माहिती भरून घेण्यात आली आहे. विवरण पत्रावर मालमत्तेमध्ये उपस्थित असलेल्या मालक, भोगवटादार, प्रतिनिधीची स्वाक्षरी घेण्यात आली आहे.
- मालमत्तेचे असे होणार योग्य मुल्यांकन
सर्वेक्षणात आढळलेल्या नवीन मालमत्तांचे कर आकारणीसाठी मालकी हक्क, बांधकाम पूर्णत्व, भोगवटा या संबंधीची कागदपत्रे उपलब्ध न झाल्यास संबंधित मालमत्तेचे मालक, भोगवटादारांना महापालिका अधिनियमाप्रमाणे कागदपत्रे मागणीपत्र द्यावयाचे आहे. आकारणी न झालेल्या नविन, वाढीव, वापर बदल मालमत्तांचे करयोग्य निश्चिती करण्यासाठी सन २००३-२००४ च्या दरपत्रकानुसार बांधकाम दर्जा, क्षेत्रफळ, वापर, बांधकाम प्रकार व इमारतीचे वय विचारात घेऊन मूल्यांकन करण्यात आलं आहे. कर आकारणीसाठी बांधकाम कधी झाले याबाबत सबळ पुराव्याची कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत कागदपत्रानुसार मालक, भोगवटादार यांचे नाव नोंदवावे. मात्र कागदपत्रे उपलब्ध न झाल्यास सद्यस्थितीत भोगवटा करीत असलेल्या भोगवटादाराच्या धारक नावाने आकारणी केली आहे. अशा प्रकारे अचूक मालमत्तांचे सर्वेक्षण झाले आहे त्यामुळे मालमत्तेची अचूक माहिती प्राप्त झाली आहे.
- नियमाप्रमाणे कर आकारणी ..
महानगरपालिकेने कुठलीही अन्यायकारक घरपट्टी नागरीकांवर लादलेली नाही. सदर आकारणीची नोटीस शासन नियमाप्रमाणे व २००४-२००५ च्या महासभा नियमाप्रमाणे होत आहे. सर्व नागरीकांना महापालिकेकडून आवाहन आहे की त्यांनी सदर कर माहितीप्रमाणे जर योग्य असेल तर कर भरून महानगरपलिका क्षेत्राच्या विकासात सहभाग नोंदवावे.