भारतीय यंत्रणांकडून योग्य पद्धतीने तपास
दिल्ली स्फोटाप्रकरणी अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियोंचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ओटावा
अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो यांनी दिल्ली स्फोटाच्या तपासावरून भारतीय यंत्रणांचे कौतुक केले आहे. अमेरिकेने मदतीचा प्रस्ताव दिला आहे, परंतु भारतीय अधिकारी असाधारण प्रोफेशन पद्धतीने तपासाचे व्यवस्थापन करत आहेत, असे वक्तव्य रुबियो यांनी कॅनडामध्ये आयोजित जी-7 विदेश मंत्र्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केले आहे. अमेरिकेने भारताला स्वत:चे समर्थन दिले असल्याचे रुबियो यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी जी-7 बैठकीच्या व्यतिरिक्त भारतीय विदेशमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेत दिल्लीतील घटनेवरून चर्चा केली आहे.
आम्ही मदतीचा प्रस्ताव दिला आहे, परंतु भारतीय अधिकारी अशाप्रकारच्या तपासात अत्यंत सक्षम आहेत असे मला वाटते. भारताला आमच्या मदतीची गरज नाही. भारतीय यंत्रणा हा तपास अत्यंत विचारपूर्वक, काळजीपूर्वक आणि अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने करत आहेत. दिल्लीतील स्फोट स्पष्ट स्वरुपात एक दहशतवादी हल्ला असून यात अत्याधिक स्फोटक सामग्रीने भरलेल्या कारमध्ये स्फोट होत अनेक लोक मारले गेले आहेत असे रुबियो म्हणाले.
10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत लाल किल्ल्यानजीक झालेल्या भीषण स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. या स्फोटाप्रकरणी भारतीय यंत्रणांनी व्यापक स्तरावर तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक टीम्स आणि दहशतवादविरोधी यंत्रणा पुरावे पडताळून पाहत असून स्फोटाच्या कटात सामील लोकांचा शोध घेतला जात आहे. यापूर्वी नवी दिल्लीतील अमेरिकेच्या दूतावासाने स्फोटानंतर भारतासोबत एकजुटता दर्शविली होती.
जयशंकर-रुबियो यांची भेट
रुबियो यांनी भारताचे विदेशमंत्री जयशंकर यांच्यासोबत बैठक घेत व्यापार, पुरवठासाखळी आणि क्षेत्रीय सुरक्षासमवेत अनेक द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. या बैठकीत युक्रेन संघर्ष, मध्यपूर्वेतील स्थिती आणि हिंद-प्रशांत क्षेत्राबद्दल विचारांचे आदान-प्रदान झाल्याचे जयशंकर यांनी सांगितले आहे.