ऐतिहासिक म्हैसूर दसरोत्सवाला चालना
साहित्यिक हंप नागराजय्या यांच्या हस्ते उद्घाटन : 12 ऑक्टोबरपर्यंत म्हैसूरनगरीत विविध कार्यक्रमांची रेलचेल
प्रतिनिधी/ बेंगळूर
विश्वविख्यात ऐतिहासिक म्हैसूर दसरोत्सवाला गुरुवारी अधिकृतपणे चालना मिळाली. चामुंडी टेकडीवर सकाळी ज्येष्ठ साहित्यिक हंप नागराजय्या यांनी चामुंडेश्वरी देवीच्या उत्सवमूर्तीवर पुष्पवृष्टी करून दसरोत्सवाचे उद्घाटन केले. त्यामुळे पुढील 9 दिवस म्हैसूरमध्ये विविध कार्यक्रमांचे रेलचेल राहणार असून शहरात देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत.
दसरोत्सव उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, मंत्री डॉ, एच. सी. महादेवप्पा, एच. के. पाटील, आमदार जी. टी. देवेगौडा यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. म्हैसूरमध्ये पुढील 9 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम, दसरा क्रीडा स्पर्धा, पुस्तक मेळा, जानपद संगीत उत्सव, वस्तू प्रदर्शन, चित्रकला व शिल्पकला शिबिर, फूड फेस्टिव्हल, फिल्म फेस्टिव्हल, फल-पुष्प प्रदर्शन आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
12 ऑक्टोबरपर्यंत दसरोत्सव चालणार असून अखेरच्या दिवशी म्हणजेच 12 रोजी विजया दशमीदिनी विश्वविख्यात जम्बो सवारी होईल. या दिवशी ‘अभिमन्यू’ हा हत्ती चामुंडेश्वरी देवीची मूर्ती विराजमान असणारी सुवर्णअंबारी पाठीवरून वाहून नेणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी बन्नीमंटप मैदानावर टॉर्च लाईट कसरतींनी दसरोत्सवाचा समारोप होणार आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत म्हैसूर राजवाड्यात देखील वडेयर राजघराण्याकडून विविध धार्मिक पूजाविधी आयोजित केल्या जातील. गुरुवारी म्हैसूर वडेयर राजघराण्याचे राजे आणि खासदार यदूवीर वडेयर यांनी सुवर्ण सिंहासनाची पूजा केली. त्यानंतर ते सिंहासनावर विराजमान झाले.
शहरातील ऐतिहासिक वास्तू, चौक, रस्ते आणि उद्याने विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहेत. शहरातील विद्युत रोषणाई हे देखील पर्यटकांचे आणखी एक आकर्षण आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पाच वर्षे मीच मुख्यमंत्री : सिद्धरामय्या
जनतेने निवडून दिलेले सरकार पाडण्याचे प्रयत्न करणे ही लोकशाहीविरोधी गोष्ट आहे. राज्यातील जनतेच्या आशीर्वादाने आम्ही 136 जागा जिंकल्या आहेत. पाचही वर्षे मीच मुख्यमंत्री असेन. पाचही वर्षे विकासकामे करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दसरोत्सव उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी सांगितले. देवराज अर्स वगळता सिद्धरामय्या यांनीच मुख्यमंत्रिपदाची 5 वर्षे पूर्ण केल्याचे जी. टी. देवेगौडा यांनी सांगितले आहे. त्यांना सत्य ठाऊक आहे. त्यामुळेच त्यांनी दुसऱ्या पक्षात राहून सुद्धा सत्य सांगण्याचे काम केले आहे. जनतेचा आशीर्वाद असेपर्यंत कुणालाही काही करता येणार नाही. चामुंडेश्वरी देवीच्या आशीर्वादाने दुसऱ्यांना मुख्यमंत्री बनलो आहे.