रिक्त पदांवर 5 वर्षे सेवा बजावलेल्यांना पदोन्नती द्या
जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांची सूचना : ग्राम पंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांची तक्रार निवारण बैठक
बेळगाव : करवसुलीची 40 टक्के रक्कम ग्रा. पं. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राखीव ठेवावी,तसेच दररोज ध्वजारोहण करणाऱ्यांना मानधन देण्यात यावे, कर संकलन कर्मचारी, लिपिक कम डाटा एंट्री ऑपरेटर्स कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यास पाच वर्षे सेवा बजावलेल्या वॉटरमन, स्वच्छता कर्मचारी किंवा शिपाई यांना पदोन्नती देऊन त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती करावी, अशी सूचना जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली.
सोमवारी जि. पं. सभागृहात ग्रा. पं.कर्मचारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारण करण्यासाठी आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. शिंदे म्हणाले, मृत ग्रा. पं. कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी तात्काळ प्रस्ताव सादर करावेत. ग्रा. पं. स्तरावर घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक घरातून शुल्क वसूल करून घनकचरा विल्हेवारीसाठी महिला संघ व स्वच्छता कर्मचाऱ्यांना मानधन देण्यासाठी पावले उचलावीत, अशी सूचना त्यांनी दिली.
स्वच्छता वाहनांसाठी निवड झालेल्या महिलांसाठी प्रशिक्षण उपक्रम आयोजित करावेत.जिल्ह्यात सर्व ग्राम पंचायतींनी कचरा विल्हेवारीला सर्वोच्च प्राध्यान्य द्यावे. कचरा शास्त्रोक्त पद्धतीने गोळा करण्यासाठी पावले उचलावीत. ता. पं. स्तरावर दरमहा तक्रार निवारण बैठक आयोजित करावी. ग्रा. पं. कर्मचारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांची माहिती जि. पं. कडे सादर करण्याची सूचनाही शिंदे यांनी दिली. यावेळी उपसचिव बसवराज हेग्गनायक, सहसचिव राहुल कांबळे यांच्यासह ता. पं. ईओ, विविध खात्यांचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.