For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

31 ऑक्टोबरपर्यंत नियुक्तीपत्रे देण्याचे ठोस आश्वासन

11:55 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
31 ऑक्टोबरपर्यंत नियुक्तीपत्रे देण्याचे ठोस आश्वासन
Advertisement

सफाई कर्मचाऱ्यांना मनपा आयुक्तांकडून ग्वाही : कावलू समितीच्या आंदोलनाला यश : विविध समस्या सोडविण्याबाबत 4 ऑक्टोबरला बैठक

Advertisement

बेळगाव : सोमवारी धरलेल्या धरणे आंदोलनानंतर मंगळवारी पुन्हा सफाई कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेसमोर ठाण मांडले. त्यानंतर तातडीने महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासोबत सफाई कावलू समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. 31 ऑक्टोबरपर्यंत सर्वांना नियुक्तीपत्र देऊ, असे ठोस आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर आंदोलन मंगळवारी मागे घेण्यात आले. आंदोलन करताच दखल घेतली गेल्याने सफाई कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात आले.

गेल्या 15 ते 20 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सफाई कर्मचारी काम करत आहेत. त्यामधील 100 जणांना तातडीने कायमस्वरुपी सामावून घेतले जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. गेल्या दीड वर्षापासून नियुक्तीपत्र देण्याचे आश्वासन दिले जात होते. पण त्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले नसल्याने सफाई कर्मचारी कावलू समितीतर्फे सोमवारी धरणे आंदोलन धरण्यात आले. महानगरपालिका आयुक्त न्यायालयीन कामकाजासाठी धारवाडला गेल्याने ते आंदोलनकर्त्यांसमोर आले नाहीत.

Advertisement

त्यामुळे मंगळवारी पुन्हा सफाई कर्मचारी आणि सफाई कावलू समितीचे सर्व पदाधिकारी महानगरपालिकेसमोर जमा झाले. त्याठिकाणी पुन्हा ठाण मांडले. तातडीने नियुक्तीपत्र देण्याची मागणी केली. संघटनेचे अध्यक्ष दीपक वाघेला, जनरल सेक्रेटरी विजय निरगट्टी, मुनीस्वामी भंडारी, षण्मुख आंदेद्र, मालती सक्सेना यांच्यासोबत आयुक्तांनी कक्षामध्येच बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवा, अशी जोरदार मागणी केली. महापालिका आयुक्तांनी 31 ऑक्टोबरपर्यंत नियमानुसार 100 कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सामावून घेऊ, असे आश्वासन दिले आहे.

4 ऑक्टोबरला पुन्हा बैठक

सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्याचा प्रश्न मिटला तरी इतर समस्या कर्मचाऱ्यांना भेडसावत आहेत. शहापूर येथील क्वॉर्टर्समधील कुटुंबीयांना अजूनही हक्कपत्र देण्यात आली नाहीत. त्यामुळे अनेक कुटुंबे अडचणीत आहेत. रमाबाई आंबेडकर हॉलमध्ये ग्रंथालय सुरू करणे, वाल्मिकी भवन बांधणे, यासह सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याची नितांत गरज आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी 4 ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्तांबरोबर बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.

अनेक संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा

सफाई कर्मचाऱ्यांनी जे आंदोलन केले त्याला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला. त्यामुळेच हे आंदोलन यशस्वी ठरले आहे. माजी महापौर अॅड. नागेश सातेरी, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी आमदार रमेश कुडची यांनी आंदोलनामध्ये भाग घेऊन पाठिंबा दर्शविला होता. याचबरोबर सफाई कर्मचारी संघटनेतील राममोहन साठे, विठ्ठल तलवार, सुभाष घराणी, सचिन देमट्टी, संभाजी कोलकार यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग दर्शवून हे आंदोलन यशस्वी केले असल्याचे दीपक वाघेला व विजय निरगट्टी यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.