महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शहर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद

10:53 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दर दोन-तीन महिन्यात हल्ल्यांच्या घटना : संपूर्णत: तोडगा काढण्यात मनपाला सपशेल अपयश

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहरामध्ये काही समस्या अशा आहेत की, त्या समस्याच रहाव्यात, असाच प्रयत्न हेतूत: होतो की काय? अशी शंका यावी. वाहतुकीची कोंडी, बसथांब्यांची दुरवस्था, कचऱ्याची समस्या अशी यादी वाढत जाईल, त्यातीलच आणखी एक सततची समस्या म्हणजे भटक्या कुत्र्यांची समस्या. संपूर्ण शहर परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. दर दोन-तीन महिन्यात कुत्र्यांकडून हल्ल्यांच्या घटना घडतच आहेत. परंतु, आजपर्यंत या समस्येवर संपूर्णत: तोडगा काढण्यात महानगरपालिकेला सपशेल अपयश आले आहे. शहरातील कुठल्याही गल्लीमध्ये जा, सर्वत्र कुत्र्यांचे कळप दिसतातच. कामावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर भुंकणे, त्याने हटकल्यास धावून जाणे किंवा हल्ला करणे हे प्रकार नेहमीचेच. गेल्या सोळा महिन्यात 44,417 जणांचा कुत्र्यांनी चावा घेतला आहे. 2024 जानेवारी ते एप्रिल या कालावधीत 9,938 लोकांना कुत्र्यांनी लक्ष केले आहे. परंतु, अद्याप त्यावर कारवाई झालेली नाही. तर 2023 मध्ये जानेवारी ते डिसेंबर दरम्यान 34,479 जणांवर कुत्र्यांनी हल्ला केला आहे.

Advertisement

 शहरात 15 हजारहून अधिक भटकी कुत्री

बेळगाव शहरात 15 हजारहून अधिक भटकी कुत्री असून जिल्ह्यात 77 हजार भटकी कुत्री आहेत. याबाबत प्रशासनाने सातत्याने अधिकाऱ्यांना सूचना देऊन भटक्या कुत्र्यांचे हल्ले नियंत्रित करा, असे सांगूनही फारसा फरक पडलेला नाही. कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी पालिकेला 1 कोटीहून अधिक निधी राखीव ठेवला जातो, परंतु त्याचीही काटेकोर अंमलबजावणी झालेली नाही.

आता वकील संघटना उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

आता भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांना वैतागून वकिलांच्या संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करा म्हणजे नेमके काय करायचे? याबद्दल मात्र स्पष्टता नाही. त्यामुळे या संघटनेच्या मागणीला प्राणीदया संघटनेने जोरदार आक्षेप घेतला आहे. या दोन संघटनांमध्ये मतैक्य होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत कुत्र्यांचे हल्ले कोणी रोखायचे? हा प्रश्न अनुत्तरीतच राहणार आहे.

...तर 10 टक्के रक्कम मोकाट कुत्र्यांसाठी खर्च करा

पूर्वी हॉटेलच्या दारामध्ये रात्रीच्यावेळी कुत्री आढळायची. हॉटेलमधून बाहेर फेकले जाणारे अन्न हे त्यांचे खाद्य असे. परंतु, आता त्याची विल्हेवाट वेगळ्या पद्धतीने लागत असल्याने कुत्र्यांना उघड्यावरचे अन्नपदार्थही मिळत नाहीत. ज्यांना पाळीव प्राणी पाळण्याची आवड आहे, किंवा ज्यांना कुत्रे पाळायची आवड आहे, त्यांनी आपल्या उत्पन्नातील 10 टक्के रक्कम मोकाट कुत्र्यांसाठी खर्च करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जाते. परंतु, चर्चा ढीगभर आणि उपाय कणभर! असेच सध्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबत म्हणावे लागेल.

कुत्र्यांकडून घरावर चढून कौले फोडण्याचा प्रकार

कुत्र्यांकडून बालकांचा चावा घेणे, मोठ्यांवर हल्ला करणे हे नेहमीचेच. परंतु, कचेरी गल्लीमध्ये एक कुत्रे दररोज रात्री घरावर चढून कौले फोडत लोकांच्या झोपेचे खोबरे करत आहे. याबाबत संबंधितांना कळवूनही अद्याप या कुत्र्याचा बंदोबस्त करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे एकूणच कुत्र्यांच्या समस्येबाबत तेच ते आणि तेच ते एवढे चर्वितचर्वणच होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article