प्रकल्प गुजरातला गेले नाहीत, तर रत्नागिरीत आले !
रत्नागिरी :
उद्योगमंत्र्यांनी सर्व प्रकल्प गुजरातला नेले, असा आरोप होतो. मात्र हे प्रकल्प गुजरातला गेले नाहीत तर ते रत्नागिरीत आले. सर्वात जास्त एमआयडीसी असणारा तालुका म्हणून रत्नागिरी तालुक्याची ओळख आहे आणि म्हणूनच जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून जिह्यातील उद्योजकांमार्फत जिह्यात 1 हजार 37 कोटींची गुंतवणूक होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री आणि जिह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
येथील स्वयंवर मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य अजगेकर, राहुल पंडित, महेश म्हाप, सुदेश मयेकर, कांचन नागवेकर आदी उपस्थित होत्या. उद्योगमंत्री सामंत म्हणाले, स्थानिक उद्योजकांच्या माध्यमातून 1 हजार 37 कोटींचे सामंजस्य करार बुधवारी झाले. यात प्रामुख्याने लोटे परशुराम येथे सुप्रिया केमिकल्स 550 कोटी गुंतवणूक करणार आहे. एमएसएमईच्या माध्यमातून 500 कोटी गुंतवणुकीचा समावेश आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात 115 टक्के उद्दिष्ट पूर्ण करत जिल्हा प्रथम क्रमांकावर राहिला आहे. सबसिडी देण्याचे प्रमाण 98 टक्के आहे. मागच्या वर्षी 1 हजार कोटींचे विस्तारीकरण झाले. त्यातील 700 कोटींची अंमलबजावणी झाली असून 300 कोटींची वर्षभरात अंमलबजावणी पूर्ण होणार आहे. परकीय गुंतवणुकीसाठी दावोसला तीनवेळा गेलो. रेड कार्पेट ही संकल्पना पुढे आणली. 96 हजार कोटींची राज्यात गुंतवणूक झाली.
सीएमईजीपी योजनेत 117 टक्के विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने कर्ज मंजूर कऊन सर्वात चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर कोटक महिंद्रा बँकेनेही चांगली कामगिरी केली आहे, असे सांगून उद्योगमंत्री सामंत म्हणाले, रत्नागिरीत सेमी कंडक्टर, डिफेन्स क्लस्टर असे मोठे प्रोजेक्ट आले आहेत. निवेंडी, वाटद या ठिकाणीही एमआयडीसी येतेय. यामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. त्यासाठी युवकांनी आवश्यक ते प्रशिक्षण घ्यावे. स्थानिकांना रोजगार व शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे. ही भावना शासनाची आहे. उद्योग कुठेही गुजरातला गेले नाहीत, ते रत्नागिरीत आले आहेत. रत्नागिरी आता उद्योग हब बनत चालली आहे, असेही उद्योगमंत्री म्हणाले.
- आणखी 10 टुरिस्ट गाड्या
महिला बचत गटांनी टुरिझमसाठी पुढे यावे, स्वयंपूर्ण व्हावे, या भावनेतून त्यांना 4 टुरिस्ट वाहने दिली आहेत. 10 वाहने अजून देणार असल्याचे सांगून उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, हाऊस बोट प्रकल्पामध्येही महिलांनी सहभागी व्हावे. स्थानिक रोजगार निर्मितीसाठी चांगल्या पर्यावरणपूरक उद्योग प्रकल्पांसाठी महिलांनी पुढे यावे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अजिबात बंद होणार नाही, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुऊवात दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. अजिंक्य अजगेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात सीएमईजीपी, पीएमईजीपीच्या लाभार्थ्यांना कर्ज वितरण पत्र देण्यात आली. त्याचबरोबर सीएमईजीपीमध्ये 100 टक्के उद्दिष्ट प्राप्त करणाऱ्या बँकांचाही यावेळी स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. महिला बचत गट उमेदअंतर्गत फुड अॅण्ड फ्रूट प्रोसेसिंग क्लस्टर चिपळूण, फिश प्रोसेसिंग क्लस्टर दापोली, गारमेंट क्लस्टर चिपळूण या तीन औद्योगिक समुहासाठी 15 लाखांचा निधी वितरित करण्यात आला. या तीन औद्योगिक समुहांसोबत 10 कोटींचे एमओयू करण्यात आले. या परिषदेला बँकर्स, गुंतवणूकदार, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.