फताटेवाडीत प्रकल्पबाधित शेतकऱ्याची आत्महत्या
एनटीपीसी गेटसमोर मृतदेह ठेवून ग्रामस्थांचा तीव्र आक्रोश
दक्षिण सोलापूर :
दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी येथील एनटीपीसी औष्णिक ऊर्जा प्रकल्प परिसरात शुक्रवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या शेतकरी कुटुंबातील मिथुन धनु राठोड (वय ४०) या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
वाढीव मोबदला मिळण्यास होत असलेला विलंब आणि कंत्राटी नोकरी मिळवण्यासाठी दलालाकडून पैशांची मागणी केल्यामुळे आलेल्या मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह थेट एनटीपीसी प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवून तीव्र आंदोलन छेडले. “जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही,” असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
- प्रकरण काय आहे?
मिथुन राठोड हे एनटीपीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी होते. त्यांना प्रकल्पाकडून वाढीव मोबदल्याची रक्कम मिळणे अपेक्षित होती, मात्र संबंधित विभागाकडून ती रक्कम मिळण्यात सतत विलंब होत होता.
त्याचबरोबर, प्रकल्पात कंत्राटी कामगार म्हणून नोकरी मिळवण्यासाठी एका दलालाने त्यांच्याकडून पैशांची मागणी केली होती. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या मिथुन यांना ही रक्कम देणे शक्य नव्हते.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पग्रस्त तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवून बाहेरील लोकांना प्राधान्य दिले जात आहे, त्यामुळे स्थानिक तरुणांमध्ये नाराजी आहे. या सर्व कारणांमुळे आलेल्या नैराश्यातून मिथुन यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
- गावकऱ्यांचा आक्रोश आणि आंदोलन
मिथुन राठोड यांच्या मृत्यूने फताटेवाडीसह परिसरातील प्रकल्पग्रस्त गावांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांनी एनटीपीसीच्या मुख्य गेटसमोर ठिय्या देत आंदोलन सुरू केले आहे.
एनटीपीसीचे अधिकारी चर्चेसाठी न आल्यामुळे आंदोलक अधिकच संतप्त झाले आणि त्यांनी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर दगडफेक केली. त्यामुळे परिसरात तणाव वाढला असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
- घटनास्थळी पोलीस व नेतेमंडळींची उपस्थिती
घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू असून, ग्रामस्थांशी समुपदेशन आणि चर्चेचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, स्थानिक नेते सुरेश हसापुरे, अभिजित कुलकर्णी, जगन्नाथ गायकवाड, सुभाष पाटोळे, नरसाप्पा दिंडोरे आदी घटनास्थळी पोहोचले असून, प्रकल्पबाधित गावांतील सरपंच, नागरिक आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.