विशिष्ट पॅरासिटेमॉल मिश्रणावर बंदी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘पॅरासिटेमॉल-इटोडॉलॅक फिक्स्ड डोस’ या औषधी मिश्रणावर केंद्र सरकारच्या औषध नियंत्रकाने बंदी घोषित केली आहे. हे औषध मिश्रण रुणांना लिहून देऊ नये, असेच रुग्णांनीही ते उपयोगात आणू नये, असा आदेश देण्यात आला आहे. हा आदेश 12 ऑगस्ट 2024 या दिवसापासून लागू करण्यात आला आहे.
या मिश्रणात पॅरासिटेमॉल आणि इटोडॉल या दोन औषधांचा समावेश आहे. ड्रग्ज टेक्निकल अॅडव्हायझरी बोर्डाने यापूर्वी एप्रिल महिन्यात या बंदीची घोषणा केली होती. या औषध मिश्रणाची निर्मिती इमक्युअर फार्मास्युटिकल्स या कंपनीकडून करण्यात येत आहे. मात्र, आता या मिश्रणाच्या उत्पादनावरही बंदी घालण्यात आली आहे. या मिश्रणाला 2009 मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्याचा उपयोग ऑस्टेओअर्थरायटिस आणि ऱ्हुमॅटॉईड अर्थरायटिस या विकारांमध्ये वेदनाशामक म्हणून केला जात होता. या मिश्रणावर बंदी घालण्यात आल्यानंतर त्याची निर्मिती करणाऱ्या कंपनीने या निर्णयाला आव्हान दिले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने नंतर हा निर्णय फिरविला होता. पण नंतर पुन्हा या औषधाची चाचणी करण्यात आली तेव्हा ते अयोग्य असल्याचे आढळल्याने पुन्हा बंदी घालण्यात आली आहे. डीटीएबी या संस्थेने या औषधाचे परीक्षण केले होते आणि अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार केंद्र सरकारने औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा 1940 अनुसार या मिश्रणावर बंदी घातली आहे.