For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रगती की अधोगती?

06:30 AM Dec 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
प्रगती की अधोगती
Advertisement

जगभरात वाढती गुन्हेगारी ही एक गंभीर समस्या बनलेली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये दोन दिवसांपूर्वी दोन व्यक्तीने अंधाधुंद गोळीबार करून सोळा लोकांना मारून टाकले. फार धक्कादायक अशी ही घटना ही गुन्हेगारी नेमकी का वाढते? याचा प्रत्येक देशाने गंभीरपणे विचार करण्याची आज गरज आहे.भारतात कायदे आहेत, पण त्याचबरोबर लोकशाही आणि मानवाधिकार यांचा विचार करूनच गुन्हेगारांना सजा दिली जाते. काहीजणांना काही वर्षे बंदिस्त ठेवून नंतर सोडून दिले जाते, जेणेकरून त्या व्यक्तीमध्ये बदल होईल. परंतु सौदी अरेबिया या राष्ट्रामधून एक धक्कादायक अहवाल हाती आला असून या देशात तब्बल 340 जणांना वर्षभरात फाशी देण्यात आली आहे. भारतात एखाद्या व्यक्तीला फाशी द्यावयाची असेल तर त्याप्रकरणी न्यायालयाने संबंधित व्यक्ती फार धोकादायक आहे आणि त्याला मृत्युदंड अर्थात फाशी देणेच योग्य, असा निवाडा दिल्यानंतर आरोपी त्या निवाड्याच्या विरोधात उच्च न्यायालयात जाऊ शकतो. तिथून तो सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर देखील सदर व्यक्ती भारताच्या राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज करू शकते. राष्ट्रपतींनी अर्ज फेटाळला तरच संबंधित गुन्हेगाराला फाशीची शिक्षा दिली जाते. आपल्याकडे फाशीच्या शिक्षेचे प्रमाण अत्यल्प आहे. भारत आज 140 कोटी प्रजेचा देश आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तेवढ्याच प्रवृत्ती असे म्हटले जाते. त्यामुळे आपल्याकडे देखील गुन्हेगारांची संख्या प्रचंड आहे, मात्र त्यातील क्वचितच एखाद्याला फाशीची शिक्षा दिली जाते, कारण मानवतेच्या दृष्टिकोनातून भारत विचार करतो. ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या जागतिक पातळीवरील संस्थेने दिलेल्या ताज्या तसेच धक्कादायक अहवालात सौदी अरेबिया या अरब राष्ट्रामध्ये त्याचा आकार देखील फार छोटा आहे, असे असतानाही तिथे यंदाचे हे वर्ष संपण्यास अद्याप काही दिवस शिल्लक आहेत आणि तिथे यावर्षी आतापर्यंत 340 लोकांना फाशी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी या राष्ट्रामध्ये 338 जणांना फाशी देण्यात आली होती, यातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे 340 पैकी सुमारे 235 जण हे ड्रग्ज व्यवहारांमध्ये गुन्हेगार म्हणून दोषी ठरलेले आहेत. याशिवाय दहशतवाद गुह्यामध्ये देखील अडकलेल्यांना फाशी दिली जाते. जागतिक पातळीवर आता सौदी अरेबिया राष्ट्रावर टीका होत आहे. एखादा आरोपी गंभीर गुन्हेगार असला तरी त्या व्यक्तीचा अभ्यास  होणे आवश्यक आहे. या व्यक्तीने अशा पद्धतीचा गंभीर गुन्हा नेमका कशासाठी केला आणि या व्यक्तीमध्ये काही सुधारणा करणे शक्य आहे काय ! याचा देखील मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार होणे आवश्यक आहे. वर्षभरात सुमारे साडेतीनशे जणांना फाशी देणे ही बाब निश्चितच गंभीर विचार करायला लावणारी आहे. आपल्या देशात नेहमीच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अनेक भागात निर्माण होतो. आपल्याकडे विविध जाती, धर्माची मंडळी एकत्रित राहते. धार्मिक तणाव वारंवार होत असतो, परंतु जिथे देशाचा प्रश्न येत असतो तिथे आपण सर्वमंडळी एकत्रित राहणे आवश्यक आहे, यातून आपण देशाचा विकास करू शकतो. जागतिक पातळीवर मानवाधिकार आयोगाने प्रत्येक राष्ट्रामधून अहवाल मागविणे आवश्यक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या देशामध्ये फाशी दिली जाते, म्हणजे त्या व्यक्तीला मारून टाकले जाते. हा प्रकार निश्चितच चिंताजनक आहे. केवळ मारून टाकणं हा पर्याय नाही, जनतेमध्ये भीती निर्माण करण्यासाठी कदाचित हा दडपशाहीचा प्रकार झालेला असावा किंवा होत असावा. एखाद्या व्यक्तीकडे ड्रग्ज सापडले नसले तरी देखील एखाद्या पोलिसाने त्याच्याकडे ड्रग्ज सापडले असा आरोप करून त्या व्यक्तीला संपवण्यासाठी जाळ्यात अडकविले तर अशा व्यक्तीचे जीवन त्याचबरोबर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे जीवन बरबाद होऊ शकते. त्यामुळेच जागतिक पातळीवर या गोष्टीचा विचार होणे आवश्यक आहे. सौदी अरेबियामध्ये ज्या व्यक्तींना फाशी दिली जाते त्यातील आणखी एक आश्चर्यकारक बाब म्हणजे सौदी अरेबियामध्ये अल्पवयीन मुलांनासुद्धा फाशी देण्यात आली. फाशी देताना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायदा आणि तत्त्वांचा विचार केलेला दिसत नाही. कारण त्या कायद्यानुसार अल्पवयीन मुलांना मृत्युदंड देण्यास प्रतिबंध आहे. सौदी अरेबिया सरकारला आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने पाच वर्षांपूर्वी नोटीस पाठविली होती. अशा बऱ्याच घटना लक्षात आल्यानंतर आयोगाच्या नोटिसीवर उत्तर देताना अल्पवयीन मुलांना यानंतर फाशी दिली जाणार नाही, असे आश्वासन त्या देशाने दिले होते. मात्र या आश्वासनाचे सरळ सरळ केलेले उल्लंघन पाहता त्यांच्याकडे गुह्याला एकमेव पर्याय म्हणजे मरेपर्यंत फाशी. यापूर्वी चीन आणि इराणमध्ये देखील मोठ्या प्रमाणात फाशी दिली जायची आणि अल्पवयीन मुलांना अशा पद्धतीचा मृत्यूदंड देणे हे नियमात बसत नाही. गुन्हेगारांची संख्या जगभरात सर्वत्रच वाढतेय, त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्रांनी एकमेकांबरोबर करार करणे आवश्यक आहे. जेणेकरून आंतरराष्ट्रीय पातळीवर जे कोणी गुन्हेगार सापडतील त्यांना त्या त्या राष्ट्रांमध्ये पोचविणे आणि नंतर त्या त्या राष्ट्रांनी त्याच्या विरोधात कारवाई करणे शक्य होईल. फाशीची शिक्षा देणे हा खरे तर पर्याय ठरत नाही. सौदी अरेबिया हे एक प्रगत राष्ट्र आहे, जरी ते छोटे असले तरी देखील आज आर्थिक क्षेत्रात या देशाने फार मोठी प्रगती साधलेली आहे. एका बाजूला आर्थिक प्रगती आणि दुसऱ्या बाजूला मानवतेच्या क्षेत्रात फार मोठी अधोगती आपल्याला दिसून येते. त्यामुळेच अशा राष्ट्रांनी भारतीय तत्वांचा देखील जरूर विचार करावा. आपल्या देशामध्ये फार मोठ्या समस्या आहेत. आपल्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी दोन हात करावे लागतात, परंतु आपल्या देशात अशा पद्धतीची हत्या केली जात नाही. भारतीय लोकशाही, भारतीय मानवाधिकार, भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा यांचा इतर राष्ट्रांनी देखील खरंतर अभ्यास करावा, कारण 140 कोटी जनतेला सांभाळणे ही तशी सोपी गोष्ट नाही आणि एवढे असून देखील आपल्या देशामध्ये लोकशाही  टिकून आहे. विविध संस्कृती आणि परंपरा यामध्ये फरक आहे, असे असले तरी सारेजण एका झेंड्याखाली वावरतात. अरेबियाच्या छोट्या राष्ट्रामध्ये गुन्हेगाराला फाशी देऊन त्याला संपविणे हा निश्चितच पुऊषार्थ ठरत नाही, उलटपक्षी गुन्हेगारांमध्ये मतपरिवर्तन करून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी कायदे नियम आणि मुळात राष्ट्रकर्त्याच्या हृदयात मानवतेचे बीज असणे तेवढेच गरजेचे असते. आर्थिक प्रगती साधली म्हणजे सर्व प्रगती साधली असे नाही, उलटपक्षी मानवतेच्या बाबतीत हा प्रकार पाहता ती अधोगतीच आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.