आज जांभरे गावात नटवर्य बाबी कलिंगण स्मृती दिनानिमित कार्यक्रम
स्व - नटसम्राटांच्या स्मृती जपणारे घाटमाथ्यावरील जांबरे गाव
दीपक गावकर ओटवणे
दशावतार नाट्यकला विश्वातील तेजोमय लखलखता तारा अर्थात नटवर्य नटसम्राट स्वतः मालक अर्थात बाबी कलिंगण ! त्यांनी ज्या पवित्र भुमीत आपला देह ठेवला, ते ठिकाण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील जांबरे गाव. सुरवातीपासूनच कलिंगण कुटुंब व या जांबरे गावाचे अतुट नाते असुन याच अनोख्या नात्यातून अकरा वर्षांपूर्वी जांबरेवासियानी आपल्या गावात त्यांच्या नावे उद्यान साकारले. तेव्हापासून त्यांच्या स्मृतिदिनासह या उद्यानाचा वर्धापन दिन जांबरेवासिय साजरा करत असुन यावर्षी हा कार्यक्रम मंगळवारी २५ नोव्हेंबरला होत आहे. यानिमित्त या गावात विविध कार्यक्रमांसह सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ (नेरूर) यांच्या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
"बाबी कलिंगण उद्यान"
स्वर्गीय नटसम्राट बाबी कलिंगण यांनी आपल्या गावात देह ठेवल्यामुळे त्यात जांबरे गावाशी त्यांचे अतुट नाते असल्याने त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी गावात त्यांच्या नावे उद्यान साकारण्याचा जांबरेवासियांनी एक तपापूर्वी केला. त्याप्रमाणे गावात अकरा वर्षापूर्वी ५ नोव्हेंबर २०१४ रोजी "बाबी कलिंगण उद्यान" साकारण्यात आले. हे सुंदर उद्यान जांबरे गावचे तत्कालीन सरपंच भागोजी गावडे व त्यांच्या सहकारी यांच्या संकल्पनेतून उद्यान बांधण्यात आले. दशावतार नाट्यकलेच्या अविरत सेवेसाठीच नटवर्य बाबी कलिंगण यांचा जन्म झाल्यामुळे दशातार नाट्यकला क्षेत्रातील त्यांचे अनमोल संस्मरणीय योगदान ओळखून जांबरेवासियांनी त्यांच्या नावे हे उद्यान साकारले. उल्लेखनीय म्हणजे दैवतांप्रमाणे स्वर्गीय नटसम्राट बाबी कलिंगण यांचे फोटो या जांबरे गावात घरोघरी पाहायला मिळतात. उद्यान साकारल्यानंतर त्याचा पहिला वर्धापनदिन सोहळा दहा वर्षांपूर्वी ५ नोव्हेंबर २०१५ रोजी जांबरेवासियांसह कलिंगण कुटुंबीय, त्यांचा सर्व मित्र परिवार यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्यावेळी स्व. बाबी कलिंगण यांचे सुपूत्र लोकराजा सुधीर कलिंगण यांनी आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत कलिंगण कुटुंबीय आणि जांबरेवासियांशी असलेले अतूट नाते यापुढे सुरू राहण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तेव्हापासून कलिंगण कुटूंबियांच्या दशावतार नाट्यक्षेत्रातील सन्मानार्थ जांबरेवासिय दरवर्षी कलिंगड कुटुंबीयांसोबत स्व. बाबी कलिंगण यांच्या स्मृती प्रत्यर्थ कार्यक्रमाचे आयोजन करतात. मात्र दशावतार नाट्यकलेची सेवा करता करता लोकप्रिय लोकराजा सुधीर कलिंगण यांचे निधन झाले. लोकराजा सुधीर कलिंगण सोडून गेल्याने हा कार्यक्रम पूढे कसा सुरू राहील याबद्धल जांबरेवासियासमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला. परंतु लोकराजा कै सुधीरजी कलिंगण यांचे सुपुत्र सिध्देश सुधीर कलिंगण याने लोकराजांनी सुरु केलेला कार्यक्रम तसाच अविरतपणे सुरू राहील याची ग्वाही देत जांबरेवासियांना त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा शब्द दिला. तेव्हापासून गेली तीन वर्ष सिध्देश कलिंगण आपल्या दशावतार नाट्यमंडळ व मित्रपरिवारासोबत कार्यक्रमाला आवर्जून हजर असतात.यावर्षी या "बाबी कलिंगण उद्याना" चा ११ वा वर्धापनदिन सोहळा सोमवारी २५ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जांबरे गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिरात सायंकाळी ७ वाजता पाहुण्यांचे स्वागत, ७:३० वाजता कै बाबी कलिंगण यांच्या प्रतिमेच पुजन, त्यानंतर मान्यवरांचे सत्कार, रात्री १० वाजता लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ (नेरूर) यांचा ' वेडा चंदन' दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. समस्त दशावतार नाट्यप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त जांबरेवासिय आणि बाबी कलिंगण कुटुंबीयांच्यावतीने करण्यात आले आहे.