For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ यांचे निधन

06:47 AM Oct 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक  पं  वसंतराव गाडगीळ यांचे निधन
Advertisement

पुणे / प्रतिनिधी

Advertisement

संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक आणि शारदा ज्ञानपीठचे संस्थापक वसंतराव अनंत गाडगीळ यांचे शुक्रवार दि. 18 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा श्रीवर्धन गाडगीळ, सून आणि नातू असा परिवार आहे. सकाळी 11 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृत विषयात पदवीपर्यंतचे अध्ययन, शारदा ज्ञानपीठाची स्थापना, संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी केलेली धडपड आणि त्यासाठी अमेरिका, आफ्रिकेमध्ये अनेक वेळा केलेला प्रवास, यातून वसंतराव गाडगीळ यांचे संस्कृतवरील प्रेमच अधोरेखित होते.

पंडित वसंतराव गाडगीळ हे संस्कृत साहित्याचे ख्यातनाम अभ्यासक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अनेकवर्षे संस्कृत भाषेच्या अभ्यासात व्रतस्थपणे कार्य केले. धर्मशास्त्र, संस्कृत वाड्.मय आणि भारतीय संस्कृतीवर त्यांनी अत्यंत मौलिक संशोधन केले. गाडगीळ यांनी धर्म, संस्कृती आणि इतिहास या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याचबरोबर भांडारकर संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्षपदही भूषविले.

Advertisement

पं. वसंत गाडगीळ हे प्रत्येक वषी पुण्यात ऋषीपंचमीनिमित्त 80 वर्षांवरील तपस्वी, विद्वान, निरनिराळ्या क्षेत्रांत सातत्याने विधायक कार्य करणाऱ्या पुण्यातील व पुण्याबाहेरील नामवंत व्यक्तींचा सत्कार घडवून आणत. ते संस्कृत भाषेविषयी नेहमी आग्रही असत. प्राचीन ग्रंथ, वेद, उपनिषदे यांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. संस्कृत भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी शारदा संस्कृत नावाने ते मासिक चालवत असत.

 संस्कृतविषयक कार्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही दखल

गाडगीळ यांनी असंख्य पुस्तकांचे प्रकाशन केले. ज्यामुळे भारतीय विद्या संचिताचे एक नवे दालन उघडले गेले. त्यातील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे ग. बा. पळसुले यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जीवनगाथा असलेले महाकाव्य ‘वैनायकम’ होय. संस्कृत भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी त्यांनी अहोरात्र काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील त्यांच्या कार्याची विशेष दखल घेतली होती. संस्कृतचे एक चालते बोलते विद्यापीठ गेले, अशीच भावना सर्व स्तरांतून व्यक्त आहे.

 संस्कृतची गोडी वाढवली : किरण ठाकुर

गाडगीळ यांनी पत्रकार, छायाचित्रकार म्हणून नानासाहेब परुळेकर यांच्यासोबत कारकिर्दीला सुरुवात केली. पं. वसंतराव गाडगीळ यांनी संस्कृत भाषेबद्दल सर्वांच्या मनात प्रेम निर्माण केले. ते भाषणसुद्धा संस्कृतमधूनच करायचे. त्यांच्यामुळे लाखो जणांना संस्कृत भाषेची गोडी लागली. त्यांचे संस्कृत भाषेवरचे प्रेम पाहून एमआयटी महाविद्यालयात त्यांना संस्कृत भाषेसाठी स्वतंत्र कार्यालय देण्यात आले होते. त्यांचे संस्कृत भाषेवरचे प्रेम पाहून गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी त्यांना बोलावून घेतले होते. पंडितजींच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदा पुण्यात आले होते. तेव्हा मोदी यांनी ये चलते नही है दौडते है, असे म्हटले होते. शृंगेरी मठातही ते वर्षातून दोन-तीन वेळा येत असत. त्यांचे संस्कृत भाषेविषयीचे कार्य अतुलनीय आहे, अशा शब्दांत तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी पं. गाडगीळ यांना श्रद्धांजली अर्पण केली.

 ठाकुर कुटुंबीयांशी व ‘लोकमान्य’शी ऋणानुबंध

पं. वसंतराव गाडगीळ यांचे माझ्या वडिलांशीदेखील आगळे ऋणानुबंध होते. त्यावेळी त्यांनी निर्भीड पत्रकार म्हणून माझे वडिल बाबुराव ठाकुर, शंकरराव किर्लोस्कर यांचा सत्कार केला होता. ते मास्टर प्रिंटर फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्षही होते. पं. वसंतराव गाडगीळ म्हणजे चालती बोलती डिक्शनरीच होती. ‘लोकमान्य’विषयी त्यांच्या मनात आस्था होती. कठीण काळातही त्यांनी साथ दिली, अशा भावनाही किरण ठाकुर यांनी व्यक्त केल्या.

Advertisement

.