‘नेस्ले इंडिया’चा नफा 986.4 कोटींवर
जुलै-सप्टेंबर तिमाहीमधील आकडेवारी
वृत्तसंस्था/मुंबई
मॅगी, चॉकलेट, कॉफी यासारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या नेस्ले इंडियाने आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत 986.4 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. त्यात वार्षिक आधारावर 8.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 908 कोटी रुपयांचा नफा झाला होता. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत कंपनीने 5,104 कोटी रुपयांचा स्वतंत्र महसूल मिळवला. गेल्या वर्षी जुलै-सप्टेंबरमध्ये तो 5,037 कोटी रुपये होता. त्यात वार्षिक आधारावर 1.34 टक्क्यांची किरकोळ वाढ झाली आहे.
समभागावर परिणाम
नेस्ले इंडियाचे समभाग एका वर्षात 2 टक्क्यांपेक्षा कमी वाढले आहेत. कंपनीचे समभाग गुरुवार, 17 ऑक्टोबर 3.46 टक्क्यांनी खाली आले आहेत. आर्थिक वर्ष 2025 च्या तिमाही निकालानंतर 2377 रुपयांवर व्यवहार करत आहेत. कंपनीचा समभाग गेल्या एका महिन्यात 6.67 टक्के, सहा महिन्यांत 3.47 टक्के खाली आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात केवळ 1.91 टक्पेंनी वाढ झाली आहे.
1959 मध्ये स्थापना
नेस्ले इंडियाची स्थापना 1959 मध्ये झाली. नेस्ले इंडिया लिमिटेड ही बहुराष्ट्रीय कंपनी नेस्लेची भारतीय उपकंपनी आहे. याचे मुख्यालय हरियाणातील गुडगाव येथे आहे. कंपनी अन्न, पेये, चॉकलेट आणि मिठाई यांसारखी उत्पादने तयार करते. मॅगी हे लोकप्रिय उत्पादन विकणाऱ्या नेस्ले इंडियाची स्थापना 28 मार्च 1959 रोजी झाली.