प्रा . सुषमा मांजरेकर यांचा पुणे येथे सन्मान
शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत प्रा . मांजरेकर राज्यात तृतीय
सावंतवाडी । प्रतिनिधी
आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसच्या सहाय्यक शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर- गोडकर यांना शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सौ. मांजरेकर यांचा उच्च माध्यमिक भाषा विभागात राज्यात तृतीय क्रमांक आला आहे.३० हजार रुपये, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुणे येथे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे च्या महात्मा फुले सभागृहात या राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन केले होते.यावेळी बोलताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, आजच्या आधुनिक काळामध्ये ऑनलाईन शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधुनिक तंत्रामुळे डिजिटल शिक्षणाला वेगळेच महत्व निर्माण झाले आहे. शिक्षक व विद्यार्थी या दोन्ही घटकांना प्रेरित करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी ही दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित केली. राज्यातील अनेक शिक्षकांनी या स्पर्धेत भाग घेतला, ही आनंददायी बाब आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची पुढील वर्षापासून अंमलबजावणी होत आहे. नवीन शैक्षणिक धोरणात आधुनिक तंत्रज्ञानाला महत्व देण्यात आले आहे. शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान अवगत केल्यास शिक्षणाचा दर्जाही अधिक सुधारेल. अशा तंत्रस्नेही शिक्षकांमुळे दर्जेदार व गुणवंत विद्यार्थी घडतील, असा आशावाद शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेच्या राज्यस्तरीय बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते.यावेळी शालेय शिक्षण विभाग प्रधान सचिव श्रीमती आय ए कुंदन, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, शिक्षण संचालक राहुल रेखावार, संपत सूर्यवंशी, महेश पालकर, आयटी विभागाचे सोनावणे, मुळये आदी उपस्थित होते.यावेळी विविध गटातील विजेत्या ८४ शिक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार ५० हजार रु , द्वितीय ४० हजार तर तृतीय पुरस्कारासाठी ३० हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले.राज्यातील शिक्षकांमध्ये तंत्रस्नेही चळवळ निर्माण व्हावी, शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी, या साठी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, डीएड, शिक्षक व मुख्यद्यापकांसाठी शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षकांसाठी व्हिडीओ निर्मिती स्पर्धा आयोजित केली होती.अशा स्पर्धेतून दर्जेदार विद्यार्थी घडतील, असा विश्वास राज्य शिक्षण सचिव श्रीमती कुंदन यांनी व्यक्त केला. स्पर्धेला उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल राज्यभरातील शिक्षकांचे कौतुक केले.