भारतात तामिर क्षेपणास्त्राची निर्मिती
इस्रायलकडून योजना : मेक इन इंडियाच्या अंतर्गत होणार निर्मिती
इस्रायल आता स्वत:च्या आर्यन डोम एअर डिफेन्स सिस्टीममधून प्रक्षेपित होणाऱ्या तामिर इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांची निर्मिती भारतात करण्याची योजना आखत आहे. या क्षेपणास्त्रांना ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाच्या अंतर्गत निर्माण केले जाणार आहे. युद्धाच्या वातावरणात तामिर क्षेपणास्त्रांची पुरवठा साखळी मजबूत करणे हा यामागील इस्रायलचा उद्देश आहे.
वृत्तसंस्था, तेल अवीव
आयर्न डोम हवाई सुरक्षा प्रणाली निर्माण करणारी इस्रायलची कंपनी ‘राफेल अॅडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टीम’ने भारतात तामिर क्षेपणास्त्राचे उत्पादन करण्याच्या योजनेला अंतिम स्वरुप दिले आहे. हा निर्णय भारत आणि इस्रायलदरम्यान दृढ होणारी रणनीतिक भागीदारी दर्शवितो. यामुळे भारत जगातील सर्वात यशस्वी शॉर्ट रेंज हवाई सुरक्षा प्रणालीपैकी एक आयर्न डोमसाठी एक महत्त्वपूर्ण उत्पादन केंद्र ठरू शकतो.
भारतात उत्पादन का?
इराणविरोधी युद्धादरम्यान इस्रायलला तामिर क्षेपणास्त्रांच्या मोठ्या साठ्याची आवश्यकता जाणवत आहे. कमी उत्पादन क्षमतेमुळे सातत्याने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना इंटरसेप्ट करण्यात अडचणी उद्भवत आहेत. याचबरोबर इस्रायलमधील क्षेपणास्त्र उत्पादन प्रकल्पांना शत्रू लक्ष्य करण्याची भीती आहे. याचमुळे इस्रायल विदेशात उत्पादन केंद्र स्थापन करून पुरवठासाखळीची निरंतरता निर्माण करू पाहत आहे. इस्रायलने यापूर्वीच अमेरिकेसोबत सहकार्य करत स्वत:च्या सीमांबाहेर तामिरचे उत्पादन वाढविले आहे. राफेल अन् रेथियॉनदरम्यान संयुक्त प्रकल्प उभारण्यात आला असून त्याला रेथियॉन राफेल एरिया प्रोटेक्शन सिस्टीम्स नावाने ओळखले जाते. हा प्रकल्प अमेरिकेत क्षेपणास्त्रांचे सुटे भाग निर्माण करतो आणि आयर्न डोमच्या उत्पादनात हातभार लावत आहे. आता भारतीय कंपन्यांशी देखील अशाप्रकारचे करार होण्याची शक्यता आहे. यामुळे निश्चितपणे भारताला तांत्रिक लाभ होऊ शकतो.
भारतात उत्पादन खर्च कमी होणार
तामिर क्षेपणास्त्राचे भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यास त्याच्यासाठीचा खर्च कमी होणार आहे. इस्रायलला मोठ्या संख्येत तामिर क्षेपणास्त्रांची आवश्यकता आहे. इस्रायलने भारतात अनेक प्रकारची शस्त्रास्त्रs निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. भारतात निर्मित क्षेपणास्त्रांना विकणे देखील इस्रायलसाठी सोपे ठरेल. युरोप आणि मध्यपूर्वेतील अलिकडच्या संघर्षानंतर रॉकेट, ड्रोन आणि लोइटरिंग म्युनिशनचे हल्ले रोखण्यास सक्षम शॉर्ट-रेंज एअर डिफेन्स सिस्टीमची मागणी वाढली आहे.