टोमॅटोचे दर घसरल्याने उत्पादक संकटात
10 ते 15 रुपये किलो, दराअभावी टोमॅटो पडून
बेळगाव : मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात 10 ते 15 रुपये किलो दराने टोमॅटो विकला जात आहे. टोमॅटोचे दर खाली आल्याने उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे ठाकले आहे. उत्पादनाचा खर्च देखील निघत नसल्याने टोमॅटोवर नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. यात्रा, जत्रा, लग्नसराई, बाजारात खरेदीला ऊत येऊ लागला आहे. त्याबरोबर वाढत्या उष्म्यामुळे पालेभाज्या, फळांना मागणी वाढू लागली आहे. होलसेल भाजी मार्केटमध्ये देखील टोमॅटोचे दर गडगडले आहेत. मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने दरात घसरण झाल्याचेही व्यापारी सांगत आहेत.
काही दिवसापूर्वी 25 ते 30 रुपये असणारा टोमॅटो 10 ते 15 रुपये किलोवर आला आहे. सर्वसामान्यांना खरेदी करणे सोयीस्कर होत असले तरी दुसरीकडे मात्र उत्पादक शेतकऱ्यांसमोर चिंता वाढली आहे. बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा आणि इतर ठिकाणी टोमॅटोची लागवड झाली आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढू लागली आहे. मात्र दर घसरल्याने टोमॅटोचे काय करावे? असा प्रश्नही उत्पादकांना पडू लागला आहे. रब्बी हंगामात टोमॅटोची लागवड करण्यात आली आहे. उत्पादनही होऊ लागले आहे. मात्र दराअभावी टोमॅटो शेतातच पडून कुजत असल्याची खंतही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.