For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाणबुडीविरोधी उपकरणांची होणार खरेदी

06:02 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाणबुडीविरोधी उपकरणांची होणार खरेदी
Advertisement

भारत-अमेरिकेदरम्यान चर्चा : लढाऊ विमानाच्या इंजिनची मिळून निर्मिती करणार

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सहमती झाली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात पाणबुडीविरोधी उपकरणांची खरेदी, लढाऊ विमानाचे इंजिन आणि मानवरहित प्लॅटफॉर्म यासारख्या महत्त्वपूर्ण प्रणालींच्या सह-उत्पादनासोबत पुढील वाटचालीकरता सहमती झाली आहे. अमेरिकेच्या विदेश मंत्र्यांनी अनुमानित 52.8 दशलक्ष डॉलर्सच्या पाणबुडीविरोधी सोनोबॉय आणि संबंधित उपकरणांच्या विदेशी सैन्यविक्रीला मंजुरी दिली आहे. हाय अल्टीट्यूट अँटी-सबमीरन वॉरफेयर (एचएएएसडब्ल्यू) सोनोबॉयला भारतीय नौदलाच्या एमएच-60 आर हेलिकॉप्टर्सकडून युद्धनौकांवर तैनात केले जाणार आहे.

Advertisement

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांच्यासोबतच्या बैठकीत संरक्षण पुढाकारांवर चर्चा केली असून यात पुरवठा साखळी सुरक्षा वाढविणे आणि हिंदी महासागर क्षेत्रात सागरी सुरक्षा वाढविण्याचे प्रयत्न सामील आहेत. तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणावर दृढतेने लक्ष केंद्रीत करत दोन्ही देशांनी युएस-इंडिया रोडमॅप फॉर डिफेन्स इंडस्ट्रीयल कोऑपरेशन अंतर्गत जेट इंजिन, मानवरहित प्लॅटफॉर्म, युद्धसामग्री आणि ग्राउंड मोबिलिटी सिस्टीम समवेत प्राथमिक सह-उत्पान्न प्रकल्पांना पुढे नेण्यावरही सहमती व्यक्त करण्यात आली आहे.

एक स्वतंत्र आणि मुक्त इंडो-पॅसिफिकचे समर्थन करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान प्रमुख संरक्षण भागीदारीला बळकट करण्याच्या प्रयत्नांना गती दिली जाईल असे पेंटागॉनकडून म्हटले गेले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्यात शुक्रवारी चर्चा झाली होती. या चर्चेचा मुख्य विषय हिंद-प्रशांत, विकसित भूराजनयिक स्थिती आणि प्रमुख क्षेत्रीय सुरक्षा मुद्दा होता. परस्पर हिताच्या प्रमुख सामरिक प्रकरणांवर स्वत:चे दृष्टीकोन मांडल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

चीनच्या भूमिकेवरही चर्चा

राजनाथ सिंह आणि ऑस्टिन यांच्यात द्विपक्षीय संरक्षण सहकार्य, औद्योगिक सहकार्य आणि सैन्य आंतरक्रियेला मजबूत करण्याच्या उपाययोजनांवर शिष्टमंडळ स्तरीय बैठकीनंतर चीनकडून दक्षिण आणि पूर्व चीन समुद्रासोबत भारताला लागून असलेल्या सीमेवर आक्रमक विस्तारवादी करण्यात येणाऱ्या वर्तनावरही चर्चा झाली आहे. द्विपक्षीय संरक्षण-औद्योगिक सहकार्य प्रकल्प आणि दोन्ही देशांचे उद्योग एकत्रितपणे काम करू शकणाऱ्या क्षेत्रांसंबंधी दोन्ही देशांच्या नेत्यांदरम्यान चर्चा झाली आहे. भारताने समोर येणाऱ्या आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी संरक्षण क्षेत्रात क्षमतावृद्धी आणि स्थायी तंत्रज्ञान आणि औद्योगिक भागीदारीसाठी अमेरिकेसोबत मिळून काम करण्याची इच्छा राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे.

या गोष्टींवरही दिला जोर

अमेरिकन गुंतवणूक आणि तंत्रज्ञान सहकार्याचे भारत स्वागत करतो. तसेच कुशल मनुष्यबळ आधार, मजबूत उद्योग व्यवस्था आणि देशांतर्गत बाजारपेठेसह भारत तयार असल्याचे राजनाथ सिंह यांनी बैठकीत नमूद केले. तर पुरवठा साखळी सुरक्षा वाढविणे, हिंदी महासागर क्षेत्रात सागरी सुरक्षा वाढविणे आणि अमेरिकेच्या कमांड्समध्ये भारतीय संपर्क अधिकाऱ्यांच्या तैनातीच्या माध्यमातून संचालन समन्वय मजबूत करण्यासाठी नव्या कराराचा लाभ घेण्यासमवेत अनेक द्विपक्षीय संरक्षण पुढाकारांमधील प्रगतीबद्दल पेंटागॉनने समाधान व्यक्त केले आहे.

Advertisement
Tags :

.