न्यायालयाच्या समोर साऊंड सिस्टीमचा दणदणाट! कानठळया बसवणारा आवाज
कसबा बावडा परिसरात न्यायसंकुलासमोरुन साऊंड सिस्टीमच्या दणदणाटात निघालेली मिरवणूक
कोल्हापूर प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती मिरवणूकीतील हिडीस दृश्य संपूर्ण कोल्हापूरने बघितले. याबद्दल सामाजिक माध्यमातून तीव्र प्रतिक्रियाही उमटल्या. पण तरुणाईवर अशा प्रतिक्रियांचा कोणताच परिणाम होत नाही, हे कसबा बावडा परिसरात गुरुवारी निघालेल्या मिरवणूकीने अधोरेखित केले. विशेष म्हणजे ही मिरवणूक कसबा बावड्यातील न्यायसंकुलाच्या इमारतीसमोरुन जात असताना साऊंड सिस्टमच्या आवाजाने ही इमारतही हादरली.
महापुरुषांच्या जयंती आणि कोणत्याही धार्मिक सणात साऊंड सिस्टमचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.या जयंत्या, धार्मिक सण म्हणजे आजच्या तरुण पिढीसाठी इव्हेंट झाले आहेत. महापुरुषांच्या जयंतीमधील वैचारिकता, प्रबोधन मागे पडले आहे तर धार्मिक कार्यक्रमातील सात्विकता संपत चालली आहे. सद्या अशा जयंत्या, सण म्हणजे नंगानाच करुन केवळ स्वत:ची काही तास करमणूक करण्याचा प्रकार सुरु आहे. जयंती आणि धार्मिक कार्यक्रमाशिवाय वाढदिवसाला साऊंड सिस्टम लावण्याचे निमित्त शोधले जात आहे. पण या साऊंड सिस्टमचा आरोग्यावर परिणाम होत आहे.
गेल्या आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी झाली. जयंतीनिमित्त कानठळ्या बसवणाऱ्या साऊंड सिस्टीममध्ये मिरवणूका निघाल्या. त्यावेळी नागरिकांनी या आवाजामुळे अक्षरश: कानाला हात लावले. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. तरीही पोलीसात याबाबत गुन्हे दाखल झालेले दिसले नाहीत.
गुरुवारी दुपारीही कसबा बावडा परिसरात एका मंडळाची मिरवणूक निघाली. या मिरवणूकीतही साऊंड सिस्टीम होती आणि त्यावर हिडीस नृत्य सुरुच होते. पण विशेष म्हणजे ही मिरवणूक न्यायसंकुल इमारतीसमोरुन जात जात होती आणि आवाज कानठळ्या बसवणारा होता. यावेळी दोन पोलीस बीट मार्शल येथूनच गेले पण त्यांनी काय कारवाई केली माहीत नाही. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता अशा प्रकारची कोणती तक्रार आली नसल्याचे उत्तर मिळाले. मोठ्या आवाजात न्यायसंकुलासमोरुन मिरवणूक गेली. न्यायसंकुलपासून पोलीस अधीक्षक कार्यालय काही मिनिटांच्या अंतरावरच आहे. तरीही पोलीस प्रशासनाला मिरवणूक दिसत नाही आणि साऊंड सिस्टीमचा आवाज आला नसेल तर आश्चर्य म्हणावे लागेल.