Kolhpaur Road: रोलर अन् बॉयलरवरुन लग्नाची वरात, नवदांपत्याने अनोखी शक्कल का लढवली?
रस्त्यांची दुर्दशा पाहून लग्नाच्या वरातीसाठी सासुरवाडीकडून रोलर व बॉयलरची भेट
कोल्हापूर : मंगळवार पेठ खासबाग परिसरातील पुणे येथे आयटी कंपनीमध्ये नोकरी करणारा प्रिन्स क्लबचा कार्यकर्ता संकेत जोशी व सोनाली नायक हे शनिवारी कोल्हापुरात विवाहबद्ध झाले. मंडळाच्या प्रथेप्रमाणे कोल्हापुरातील रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेकडे लक्ष वेधण्यासाठी नवदांपत्याची डांबरीकरणाचा रोलर व बॉयलरवर बसून पारंपारिक लेझीम, हलगी घुमके आणि सनईच्या तालावर अनोखी वरात काढण्यात आली.
महाव्दार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटीमार्गे खासबागेपर्यंत निघालेली ही अनोखी वरात नागरिकांचे लक्ष वेधून चर्चेचा विषय ठरली. शहरातील खराब रस्त्याकडे लक्ष वेधण्यासाठी नवदापत्यांनी रोलर आणि बॉयलरवर बसून लग्नाची अनोखी वरात काढली. कोल्हापूर शहरामध्ये रस्त्यांची कामे दर्जेदार होत नाहीत. अनेक रस्ते खड्ड्याने माखले आहेत. लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाला विकासाचे व्हिजन नाही.
राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्याईवर शासनाकडून अतिशय तोकडा निधी येतो. त्यातही अधिकारी, लोकप्रतिनिधी टक्केवारी मिळविण्यासाठी निकृष्ट दर्जाची अनावश्यक विकास कामे शहराच्या माथी मारतात. त्यामुळे मोठमोठे उद्योग धंदे आयटी पार्क येथे प्रगत झालेला नाही. त्यामुळे युवकांना रोजगारासाठी पुणे, बेंगलोरसह परदेशात नोकरी शोधावी लागते याची नवरदेव व मित्रमंडळींना खंत आहे.
कोल्हापूरच्या रस्त्यांची ही दुर्दर्शा पाहून लग्नाच्या वरातीसाठी सासुरवाडीकडून डांबरीकरणाचा रोलर व बॉयलरही स्पेशल भेट मिळाली. म्हणून त्यावरून मंडळाच्या वतीने लग्नाची अनोखी वरात काढण्यात आली. या वरातीचे संयोजन सचिन साबळे, अभिजीत पोवार, नामदेव माळी, संदीप पोवार, विशाल कोळेकर, विराज जगताप, बंडू हावळ, रमेश मोरे, अशोक पोवार, आदी कार्यकर्त्यांनी केले.