पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीची साडेआठ तासात सांगता
यंदा डीजेसह ढोल-ताशांचा आवाज खालावला, गणरायाला भावपूर्ण निरोप
पुणे / प्रतिनिधी
रांगोळ्यांच्या पायघड्या...सुरेल सनईवादन...बँड पथकाचे सुमधूर वादन...आकर्षक रथ...ढोल ताशांचा गजर अन् गणेशभक्तांचा अलोट उत्साह...अशा भारावलेल्या वातावरणात मानाच्या पाच गणपतींना शुक्रवारी निरोप देण्यात आला. मानाच्या गणपतींची ही वैभवशाली मिरवणूक सुमारे साडेआठ तासांपर्यंत चालली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मुख्य विसर्जन मिरवणुकीत डीजेसह ढोल ताशांचा आवाज यंदा लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून आले.
मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते आरती करून सकाळी 9.30 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. महापौर मंजुषा नागपुरे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी उपसभापती, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते. सकाळी साडेनऊ वाजता मिरवणुकीला सुऊवात झाली. चांदीच्या पालखीमध्ये कसबा गणपती विराजमान होता. पावणे अकराच्या सुमारास कसबा गणपतीचे बेलबाग चौकात आगमन झाले. पर्यावरणपूरक ‘हरित रथा’च्या माध्यमातून पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. कसबा गणपतीच्या पुढील रमणबाग युवा मंच, परशुराम ढोल-ताशा पथक आणि ऊद्रगर्जना ढोल-ताशा पथकांच्या वादनाने लक्ष्मी रस्ता दुमदुमून गेला. यानंतर विविध दिंड्या तसेच कामायनी प्रशालेच्या विशेष मुलांच्या दिंड्यांनी वातावरणात चैतन्य भरले. यातून महाराष्ट्राच्या समृद्ध वाद्यपरंपरेचे दर्शन घडले. तसेच बँक ऑफ इंडियाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत जनजागृतीपर संदेश दिला. दुपारी साडेतीन वाजता गणरायाचे अलका चौकात आगमन झाले. त्यानंतर 4 वाजून 40 मिनिटांनी गणपतीचे पांचाळेश्वर घाटावर विसर्जन झाले.
कसबा गणपती पाठोपाठ मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मार्गस्थ झाला. श्रींची विलोभनीय मूर्ती चांदीच्या पालखीत विराजमान झाली होती. मिरवणुकीच्या अग्रभागी सतीश आढाव यांच्या नगारावादनानाने वातावरणात भक्तीरस निर्माण केला. यानंतर न्यू गंधर्व बँड पथकाच्या सुरावटींनी गणेशभक्तांची मने जिंकली. यानंतर विघ्नहर्ता, शिवमुद्रा या ढोल-ताशा पथकातील वादनाने श्रोते तल्लीन झाले. यानंतर विष्णूनाथ हे शंख वादनाचे पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले. पावणे चारला गणरायाचे अलका चौकात आगमन झाले आणि वातावरण प्रसन्न झाले. पाच वाजून दोन मिनिटांच्या सुमारास गणपतीचे विसर्जन झाले.
तांबडी जोगेश्वरी गणपतीपाठोपाठ मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मिरवणुकीत सहभागी झाला. गुरुजी तालीम मंडळाची मिरवणूक ‘माता महाकाली’ या फुलांच्या आकर्षक रथातून काढण्यात आली. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर यांच्या नगारावादनाचा गाडा होता. यानंतर अश्वराज ब्रास ब्रँडच्या सुरेल सजावटीत गणेश भक्त भारावून गेले. गर्जना आणि नादब्रम्ह, शिवर्जना ढोल-ताशा वादनाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले. या मिरवणुकीत गुलालाची मुक्तहस्ते उधळण करण्यात आली. साऊंड सिस्टम, गुलालामध्ये न्हाऊन निघालेले कार्यकर्ते यासह 4.10 मिनिटांनी गणपती टिळक चौकात दाखल झाला. पाच वाजून पाच मिनिटांच्या सुमारास या गणपतीचे विसर्जन झाले.
या पाठोपाठ फुलांच्या आकर्षक सजावटीने साकारलेल्या विष्णूरथावर तुळशीबागचा गणपती विराजमान होता. रथावर गाय, हत्ती, नाग आणि मत्स्य या मूर्तीही आकर्षण ठरत होत्या. गणपती दाखल होताच त्याचे जल्लोषात स्वागत झाले. लोणकर बंधूंची सनई आणि बिडवे बंधूंच्या नगारा वादनाने गणेशभक्त भारावून गेले. स्व-रूपवर्धिनी, गजलक्ष्मी आणि शिवमुद्रा या ढोल-ताशा पथकांच्या वादनाने आसमंत दुमदुमला. स्व-रूपवर्धिनी शाळेतल्या मुलांनी केलेले वादन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. पाच वाजता गणपती अलका चौकात दाखल झाला. पाच वाजून 34 मिनिटांच्या सुमारास या गणपतीचे विसर्जन झाले.
यानंतर ‘सुजलाम् सुफलाम् रथा3=तून मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपती मिरवणुकीत सहभागी झाला. बिडवे बंधू यांचे नगारावादन मिरवणुकीच्या मध्यभागी होते. श्रीराम, शिवमुद्रा आणि अभेद्य या ढोल-ताशा पथकांनी वाजवलेल्या तालावर गणेशभक्तांनीही ठेका धरला. इतिहासप्रेमी मंडळाने ‘लोकमान्य टिळक, आगरकर यांची डोंगरी कारागृहातून सुटका झाल्यावर महात्मा फुलेंनी केलेले स्वागत’ हा सादर केलेला देखावा लक्षवेधक ठरला. पावणेसहाच्या सुमारास गणपती टिळक चौकात दाखल झाला. सहा वाजून 12 मिनिटांच्या सुमारास या गणपतीचे विसर्जन झाले.
यंदा गर्दी कमीच
मानाचे गणपतींच्या दर्शनासाठी पुणेकरांनी यंदाही मोठी गर्दी केली होती. परंतु, दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी गर्दी कमी जाणवली. परदेशी नागरिकही या मिरवणुकीत हिरीरिने सहभागी झाले.
रांगोळ्यांच्या पायघड्या
सकाळी साडेदहा वाजता राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला मंडई येथून प्रारंभ झाला. प्रत्येक चौकात राष्ट्रीय कला अकादमीकडून मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. अन्नसुरक्षा आणि अन्नातील भेसळ या विषयावर चौकाच्या मध्यभागी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
डीजेसह ढोल-ताशांचा आवाज खालवला
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूळ रत्नागिरीकर असलेल्या विद्यानंद बापट यांनी डीजेच्या दणदणाटाचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर शहरात ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. शहरासह राज्यभर या विषयावर ऊहापोह, मतमतांतरे झाली. त्यामुळे मिरवणुकीत काय होणार, याबाबत औत्सुक्य होते. प्रत्यक्ष मिरवणुकीत डीजेसह ढोल ताशांचा आवाज मोठ्या प्रमाणात खालावल्याचे दिसून आले. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. परंतु, डीजेचा दणदणाट कमी झाल्याने गणेशभक्तांनी सुटकेचा निश्वास घेतला. उपनगरात मात्र काही ठिकाणी डीजेचा दणदणाट सुरू होता.