शिवरायांची मूर्ती मिरवणूक अमाप उत्साहात
आंबेवाडीत न भूतो न भविष्यती मिरवणुकीने नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले : हजारोंच्या संख्येने शिवभक्त मिरवणुकीत सहभागी
वार्ताहर/हिंडलगा
आंबेवाडी येथे सिंहासनाधिष्ठ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी अनगोळ येथून भव्य मिरवणुकीने छत्रपती शिवरायांच्या जयजयकारात दि. 1 रोजी उत्साहात आणण्यात आली. मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने भगवे झेंडे, भगव्या टोप्या, भगव्या साड्या व पारंपरिक वेशभूषा करून शेकडो शिवप्रेमींनी सहभाग दर्शविला. न भूतो न भविष्यती अशा प्रकारची ही आंबेवाडी गावातील पहिलीच शोभायात्रा असल्याचे बोलले जात होते. अत्यंत शिस्तबद्धपणे मिरवणूक काढण्यात छत्रपती शिवस्मारक संघाने परिश्रम घेतले. या मिरवणुकीत मण्णूर येथील धनगरांचे ढोल पथक, वक्रतुंड ढोल ताशा पथक, गजवक्र ढोल ताशा पथक, ठळकवाडी येथील बालिका विद्यालयाचे रणरागिनी ध्वज पथक व गावातील भजनी मंडळ अग्रभागी होते.
सकाळी 9 वाजता अनगोळ येथील मूर्तिकार विक्रम जे. पाटील यांच्याकडून मूर्ती स्वाधीन करताना मंडळाचे पदाधिकारी संजय तरळे, शिवाजी अतवाडकर, विनायक काकतकर, अनिल अतवाडकर, अनंत तुडयेकर, गजानन घुग्रेटकर, मदन शहापूरकर, संदीप तरळे, महादेव चौगुले यांच्या हस्ते मूर्तिकाराचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीचा शुभारंभ अन्नपूर्णेश्वरी कार्यालयाच्या समोर बेळगाव महानगरपालिकेचे महापौर मंगेश पवार यांच्या हस्ते करण्यात आला. मूर्ती सवाद्य मिरवणुकीने शिवाजी महाराजांच्या घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी करत धर्मवीर संभाजी चौकात आली असता श्रीराम सेनेचे नेते रमाकांत कोंडुसकर, म. ए. समितीचे नेते प्रकाश मरगाळे, शिवाजीराव हंडे आदी मान्यवरांनी मूर्तीची पूजा करून शुभेच्छा दिल्या.
हिंडलगा येथे ही मिरवणुकीची शोभायात्रा आली असता बॉक्साईट रोड येथील नियोजित श्री. स्वामी समर्थ मंदिराच्या प्रांगणात ग्रामपंचायत अध्यक्षा मीनाक्षी हित्तलमणी, सदस्य रामचंद्र मनोळकर, नागेश मनोळकर व इतर सर्वांच्या हस्ते मूर्तीची पूजा करून स्वागत केले. यावेळी गजानन घुग्रेटकर यांनी मिरवणुकीतील शिवभक्तांना अल्पोपहार दिला. संध्याकाळी 5 वाजता गावच्या प्रवेशद्वारातील मसनाई मंदिरसमोर गावच्यावतीने व श्रीराम सेनेतर्फे मूर्तीचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवभक्तांनी फुलांची उधळण करत, शिवरायांचा जयघोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. गणपती मंदिरसमोर मूर्ती आली असता ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी यळगुकर यांनी मूर्तीची पूजा केली. त्यानंतर मारुती गल्ली, भावकाई गल्ली, घळगेश्वर गल्ली, रामदेव गल्ली, नवीन गल्ली अशा प्रमुख मार्गावरून फिरून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चौथऱ्याजवळ आणण्यात आली. गावात ठिकठिकाणी विविध मंडळांनी मूर्तीची पूजा केली. त्यानंतर चौथऱ्यावर ही मूर्ती ठेवण्यात आली.
मिरवणूक तब्बल 14 तास
संपूर्ण गावभर भगवे ध्वज, भगव्या पताका, विद्युत रोषणाई, ठिकठिकाणी रांगोळ्या, स्वागताचे फलक, भगवी तोरणे, त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूने छोटे मावळे हातात ध्वज घेऊन शिवरायांचा जयघोष करत होते. मिरवणुकीला 14 तास लागले. मिरवणुकीवर काकती पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सुरेश शिंगे, मंजुनाथ नायक यांनी नियंत्रण ठेवले होते. मिरवणुकीचा सोहळा पाहण्यासाठी गाव व परिसरातील शिवप्रेमींनी गर्दी केली होती.
शनिवारी मूर्तीची प्रतिष्ठापना
मिरवणुकीचा समारोप होत होताना युवा कार्यकर्ते विनोद काकतकर व महेश कणबरकर यांनी 2500 शिवभक्तांना भोजन दिले. मिरवणुकीत पोवाडे व शिवाजी महाराजांच्यावर आधारित गाणी लावून एक आदर्श निर्माण केला. मूर्तीची प्रतिष्ठापना शनिवार दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे.