आगामी अर्थसंकल्पाच्या निर्मिती प्रक्रियेला प्रारंभ
खर्चात कपात करण्यासाठी विविध सूचना
पणजी : आगामी अर्थसंकल्पाच्या निर्मिती प्रक्रियेला प्रारंभ झाला असून वित्त खात्याने बुधवारी सायंकाळी जारी केलेल्या आदेशानुसार नव्याने कर्मचारी भरती व बढती तसेच नव्याने कोणत्याही खर्चाला मान्यता देऊ नये. त्याचबरोबर खर्चात कपात करावी, अशा अनेक सूचना सर्व खात्यांना जारी केल्या आहेत. वित्त खात्याचे अवर सचिव नरेश गावडे यांनी वर्षाअखेरीस हा आदेश जारी केला आणि त्यामधून त्यांनी सरकारच्या वायफळ खर्चाला देखील कात्री लावली आहे. नव्याने कोणतीही वाहने खरेदी करू नयेत. तसेच नव्याने कोणताही खर्च करण्यास बंदी घातली आहे. नव्याने कर्मचारी भरती करता येणार नाही. अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना बढती देखील देऊ नये अशी सूचना त्याद्वारे केली आहे.या आदेशाची आजपासून अंमलबजावणी होत असून यादरम्यान कार्यालयांमध्ये कोणत्याही नव्याने वस्तू खरेदी करता येणार नाही. नवे कोणतेही प्रकल्प हाती घेता येणार नाहीत. तसेच कंत्राटदारांना देखील पैसे देता येणार नाहीत. मात्र यापूर्वीचे जे कंत्राटदार आहेत आणि त्यांना खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे, अशा काही कंत्राटदारांना सरकारच्या परवानगीने त्यांची रक्कम देण्यास मुभा दिली आहे. खर्चावरील बंदी 31 मार्चपर्यंत आहे.