एसबीआयच्या डिजिटल सेवांमध्ये अडचणी
युपीआय, एनईएफटीसह योनो सेवांमध्ये समस्या
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने 2 जुलै रोजी त्यांच्या डिजिटल बँकिंग सेवा स्थगित केल्या होत्या. यामुळे बँक ग्राहकांना योनो, युपीआय, आरटीजीएस, एनइएफटी, आयएनबी आणि आयएमपीएस सारख्या सेवा वापरताना तांत्रिक समस्या येत राहिल्या असल्याची माहिती आहे. वेबसाइट्स आणि ऑनलाइन सेवांची रिअल-टाइम स्थिती प्रदान करणाऱ्या प्लॅटफॉर्म डाउन डिटेक्टरनुसार, दुपारी 12:45 ते दुपारी 2:00 दरम्यान, 800 हून अधिक वापरकर्त्यांनी एसबीआयच्या सेवा बंद असल्याच्या तक्रारी केल्या होत्या.
एसबीआयचे स्पष्टीकरण
यावर स्पष्टीकरण देताना एसबीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, ‘तांत्रिक समस्यांमुळे आमच्या योनो, युपीआय, आरटीजीएस, एनइएफटी, आयएनबी आणि आयएमपीएस सेवांवर परिणाम झाला आहे. सेवा ‘14:30पीएम’ (आयएसटी) पर्यंत उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान, ग्राहकांना आमच्या युपीआय लाइट आणि एटीएम सेवांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात अला होता. झालेल्या गैरसोयीबद्दल एसबीआयने दिलगीरी व्यक्त केली आहे.