For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्रोच्या एनव्हीएस-02 अंतराळ मोहिमेत समस्या

06:43 AM Feb 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
इस्रोच्या एनव्हीएस 02 अंतराळ मोहिमेत समस्या
Advertisement

चालू वर्षातील पहिले उड्डाण : शास्त्रज्ञांना धक्का

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अलिकडेच आपले 100 वे रॉकेट मिशन लाँच केले होते. तथापि, या मोहिमेत तांत्रिक समस्या येत असल्याचे दिसून आले आहे. बुधवारी प्रक्षेपित केलेला नेव्हिगेशन उपग्रह एनव्हीएस-02 तांत्रिक बिघाडामुळे त्याच्या नियुक्त कक्षेत पोहोचू शकला नाही. इस्रोने आपल्या वेबसाईटवर एक अपडेट दिली असून त्यात उपग्रहाला नियुक्त केलेल्या ठिकाणी पोहोचवण्याच्या प्रक्रियेत समस्या येत असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

उपग्रहाच्या इंजिनला त्याची कक्षा वाढवण्यासाठी ऑक्सिडायझर पुरवणारे व्हॉल्व्ह उघडण्यात अयशस्वी झाल्यामुळे त्याची उंची वाढली आणि पुढील कारवाईमध्ये अडचणी निर्माण झाल्या, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

मागील बुधवारी सकाळी 6:23 वाजता इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून जीएसएलव्ही-एफ15 रॉकेटद्वारे एनव्हीएस-02 चे यशस्वी प्रक्षेपण केले. इस्रोचे नवे अध्यक्ष व्ही. नारायणन यांच्यासाठीही हे अभियान महत्त्वाचे होते, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली हे पहिलेच प्रक्षेपण होते. हे इस्रोचे चालू वर्षातील पहिले मोठे अभियान आहे. तथापि, आता तांत्रिक बिघाडामुळे मोहिमेच्या यशाबद्दल शंका निर्माण झाली आहे.

शास्त्रज्ञांकडून दुसऱ्या पर्यायांचा विचार

इस्रोचे शास्त्रज्ञ या उपग्रहाचा दुसरा काही उपयोग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. याच मोहिमेच्या माध्यमातून अन्य कोणत्या प्रकारे माहिती गोळा करण्यासाठी करता येईल, यावर शास्त्रज्ञ विचारमंथन करत आहेत. मात्र, सदर उपग्रह ज्या कामासाठी पाठवण्यात आला होता ते काम अपूर्ण राहण्याचे संकेत मिळत आहेत. इस्रोच्या मते, सध्या उपग्रह सुरक्षित असून तो लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे.

Advertisement
Tags :

.