For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्याबाहेरील लोकांमुळे समस्या

10:55 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोव्याबाहेरील लोकांमुळे समस्या
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : गोवा विधिकार दिन सोहळा उत्साहात

Advertisement

पणजी : राज्यात 2000 सालानंतर परराज्यातील लोक वाढल्यामुळे त्याचा परिणाम काही प्रमाणात झालेला आहे, हे मी मान्य करतो. परंतु विकासासाठी सरकारने घेतलेले निर्णय हे कायद्याला धरून आणि चौकटीत बसणारे आहेत. गोव्याबाहेरील लोकांमुळे आज समस्या निर्माण होत आहेत, त्या सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. जमीन रुपांतरण होऊ नये, याकडे सरकार गांभीर्याने असल्याने शेत जमिनीचे रुपांतरण कदापिही होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पर्वरी येथील विधानसभा सभागृहात गोवा विधीकार मंचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विधीकार दिन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर पद्मश्री डॉ. जे. एम. व्यास, सभापती गणेश गावकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, फोरमचे उपाध्यक्ष व्हिक्टर गोन्साल्वीस, खजिनदार सदानंद मळीक उपस्थित होते.

म्हादई बाजू कमकुवत होऊ देणार नाही

Advertisement

मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, आजी-माजी आमदारांनी विधीकार दिन कार्यक्रमात मांडलेल्या सूचना आणि घेतलेल्या हरकती ह्यावर सरकार नक्कीच विचार करेल. ज्या ज्या गोष्टी हितकारक असतील, त्या निश्चितपणे विचारात घेतल्या जातील. आजी-माजी आमदारांनी तसेच खासकरून म्हादईसाठी लढणाऱ्या निर्मला सावंत यांनी जो म्हादईचा मुद्दा उपस्थित केला तो विचाराधीन आहे. म्हादईचे पाणी कोणत्याही परिस्थितील राज्याच्या बाहेर जाणार नाही. म्हादईचे प्रकरण हे न्यायालयात असल्याने या प्रकरणावर मी स्वत: लक्ष ठेवून आहे. कोणत्याही परिस्थितीत म्हादईचे प्रकरण न्यायालयात कमकुवत होऊ देणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री सावंत यांनी उपस्थितांना दिला.

दिवंगत आमदारांना श्रद्धांजली

कार्यक्रमाच्या सुरवातीला विधिकार दिन सोहळ्यात दिवंगत आमदार लवू मामलेदार, माजी मुख्यमंत्री रवी नाईक, माजी आमदार परशुराम कोटकर यांना श्रद्धांजली वाहिण्यात आली.  त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समई प्रज्वलीत करून विधिकार दिन कार्यक्रमाला सुरुवात केली.

आमदारांनी मांडल्या सूचना

माजी आमदार प्रकाश वेळीप, निर्मला सावंत, एदुआर्द फालेरो, माजी सभापती शंभू भाऊ बांदेकर व इतर आमदारांनी आपल्या सूचना यावेळी मांडल्या.

माजी आमदारांचा सत्कार

माजी आमदारांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये तोमाझिन कार्दोज, फातिमा डिसा, श्रीकृष्णा कुट्टीकर, सदानंद मळीक, नरहरी हळदणकर, दिगंबर कामत, आगास्तुयो डिसोझा, विष्णू प्रभू, गोविंद आचार्य, ज्योकिम आलेमाव यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सभापती गणेश गावकर यांनी स्वागतपर भाषणात विधानसभा सभागृहाची जबाबदारी आणि आमदारांचे कर्तव्य या विषयावर भाष्य केले. माजी आमदार मोहन आमशेकर यांनी सूत्रसंचालन केले. माजी आमदार व्हिक्टर गोन्साल्वीस यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :

.