बाजारपेठेत वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा
गणेश चतुर्थी खरेदीसाठी गर्दी : वाहनधारक-पादचाऱ्यांची दमछाक
बेळगाव : गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या खरेदीसाठी नागरिकांची संख्या वाढत असल्याने शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचे तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे. विविध मार्गांवर वाहतूक कोंडीतून बाहेर पडताना वाहनधारकांची दमछाक होऊ लागली आहे. वाढत्या वाहतूक कोंडीने गणेशोत्सवाची खरेदी नको रे बाबा म्हणण्याची वेळ आली आहे.
शहरातील समादेवी गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रामदेव गल्ली, मारुती गल्ली, गणपत गल्ली, टिळक चौक, नरगुंदकर भावे चौक, शनिवार खूट, खडेबाजार आदी ठिकाणी कोंडीची समस्या निर्माण झाली. शिवाय मुख्य रस्त्यावर वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी अवजड आणि चारचाकी वाहनांना निर्बंध घालण्यात आले. यंदे खूट, किर्लोस्कर रोड, चन्नम्मा चौक आदी प्रवेशद्वारावरच अवजड आणि चारचाकी वाहनांना रोखण्यात आले. केवळ अत्यावश्यक म्हणून लहान मालवाहू वाहनांना सोडण्यात आले.
बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने यामध्ये दुचाकी आणि पादचाऱ्यांसमोरही अडचणी निर्माण झाल्या. काही ठिकाणी पादचाऱ्यांना ये-जा करणेही अशक्य झाले होते. त्यातच अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांचीही तारांबळ उडाली. सकाळपासूनच खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याने सर्वच मार्गांवर वाहनधारकांसह नागरिकांचीही गर्दी होऊ लागली आहे. शिवाय या गर्दीतून बाहेर पडताना दमछाक होत आहे.
गणरायाच्या स्वागतासाठी भक्तांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. विविध सजावटीचे साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. विशेषत: पांगुळ गल्ली, मेणसी गल्ली आणि गणपत गल्लीत गर्दी अधिक असल्याने चालणेही अशक्य होऊ लागले आहे. रात्री उशिरापर्यंत खरेदीची लगबग असल्याने बाजारपेठ फुल्ल झाल्याचे दिसत आहे. बैठ्या आणि इतर लहान-सहान व्यावसायिकांना या गर्दीमुळे साहित्य विकणेही अडचणीचे ठरू लागले आहे.