For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्या कारभाराची चौकशी करावी

04:56 PM Mar 12, 2025 IST | Pooja Marathe
उपवनसंरक्षक जी  गुरुप्रसाद यांच्या कारभाराची चौकशी करावी
Advertisement

यशवंत क्रांती संघटनेची मागणी

Advertisement

कोल्हापूर

कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी वनवासी शेतकरी व पशुपालक यांच्यासाठी अन्यायकारक व मनमानी पद्धतीचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयामुळे अनेक नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी पत्रकार परिषदेत केली.

Advertisement

संजय वाघमोडे यांनी सांगितले वनहक्क मिळालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई पासून वंचित ठेवले जात आहे. वन हक्क कायद्यांतर्गत ज्या वनवासी नागरिकांना जमीन वाटप करण्यात आले आहे, त्यांना २५ मे २०२३ च्या एका आदेशाद्वारे वन्य प्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यास नकार देण्यात आला आहे. शासनाने असे कोणतेही अधिकृत निर्देश दिलेले नसताना हा निर्णय घेण्यात आला असून शेकडो नागरिकांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. यशवंत क्रांती संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यानंतर १४ ऑक्टोबर २०२४ रोजी नवीन आदेश काढण्यात आला. ज्यामध्ये पूर्वीचा निर्णय बदलण्यात आला. हा बदल पूर्वीच्या चुकीच्या निर्णयाचे प्रमाण आहे. मात्र २५ मे २०२३ ते १४ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्यानुकसानीची जबाबदारी कोणाची असा प्रश्न वाघमोडे यांनी उपस्थित केला आहे.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या जनावरांचे मृतदेह सात दिवस ट्रॅप कॅमेऱ्याच्या निगराणी मध्ये ठेवण्याचा आदेश देण्यात आला असून तो अमानवीय आणि अन्यायकारक आहे. परिणामी पशुपालकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. संघटनेच्या विरोधानंतर हा आदेशही मागे घेण्यात आला असला तरी आजही अशाच प्रकारची टाळाटाळ होत असल्याचे वाघमोडे यांनी सांगितले.

वन हक्क अंतर्गत जिह्यात ३८५० दावे दाखल होते. त्यापैकी १३८६ दाव्यांचा निर्णय अंतिम झाला आहे. जिल्हा समितीकडे २१०७ दावे आहेत.नामंजूर दावे ३३३ आहेत असे वाघमोडे यांनी सांगितले.

वनवासीवर अन्याय करणाऱ्या वनसंरक्षक गुरुप्रसाद यांच्या मनमानी कार्यपद्धतीची तात्काळ चौकशी करून निलंबन करावे, पिक नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना व्याजासह नुकसान भरपाई मिळावी, अन्याय झालेल्या शेतकरी व पशुपालकांना नुकसान भरपाई, संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करून द्यावी अशा ११ मागण्या संघटनेने केल्या आहेत. या मागण्यांचा तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा वाघमोडे यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेला संजय डफडे, सुनील शेळके, आप्पाजी मेटकर उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.