प्रो लीग कुस्ती स्पर्धा डिसेंबर महिन्यात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2019 नंतर म्हणजेच तब्बल 6 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीने प्रो लीग कुस्ती स्पर्धेचे पुनरागमन होत असून ही स्पर्धा येत्या डिसेंबरमध्ये घेतली जाणार आहे. सदर स्पर्धा यापूर्वी 2019 साली घेण्यात आली होती. त्यानंतर कोरोना समस्येमुळे सदर स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली होती. दरम्यान मध्यंतरी ऑलिम्पिक स्पर्धेच्या पूर्वतयारी करता भारतीय मल्ल सरावात गुंतले असल्याने ही स्पर्धा घेण्यात आली नव्हती.
या आठवडाअखेरीस अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनतर्फे बैठक बोलाविली जाणार आहे. तत्पूर्वी प्रो लीग कुस्ती स्पर्धेसाठी नव्या फ्रांचायझीबरोबर फेडरेशनचे पदाधिकारी चर्चा करीत असल्याचे सांगण्यात आले. या लीग स्पर्धेसाठी मल्लांचा लिलाव नव्याने करण्यात येणार आहे. कुस्ती हा क्रीडा प्रकार अधिक प्रसिद्ध व्हावा यासाठी 2015 साली प्रो लीग कुस्ती स्पर्धा भरविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ही स्पर्धा चार वर्षे सलग घेण्यात आली होती. 2019 च्या प्रो लीग कुस्ती स्पर्धेत एकूण 6 संघांचा समावेश होता. दिल्ली सुलतान्स, युपी दंगल, हरियाणा हॅमर्स, एमपी योद्धा, मुंबई महारथी आणि एनसीआर पंजाब रॉयल्स या संघांकडून अव्वल मल्लांनी आपला सहभाग दर्शविला होता. आशिया, युरोप, आफ्रिका आणि अमेरिका या विभागातील मल्लांना या स्पर्धेसाठी निमंत्रित केले जाईल. 2019 ची प्रो लीग कुस्ती स्पर्धा हरियाणा हॅमर्सने जिंकताना पंजाब रॉयल्सचा पराभव केला होता.