प्रो लीग हॉकी : भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलियाला धक्का
वृत्तसंस्था/ रूरकेला
आघाडीपटू वंदना कटारियाने पेनल्टी कॉर्नरवर केलेल्या गोलाच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने येथे झालेल्या एफआयएच प्रो लीगमधील सामन्यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला 1-0 ने हरवत धक्का दिला.
कटारियाने 34 व्या मिनिटाला हा गोल केला. जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या भारताचा हा स्पर्धेतील दुसरा विजय असून भुवनेश्वरमध्ये गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाकडून स्वीकाराव्या लागलेल्या 0-3 अशा पराभवाचा वचपाही त्यांनी काढला. ऑस्ट्रेलियाला तिसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाल्याने भारत पहिल्या सत्राच्या सुऊवातीलाच दडपणाखाली आला होता. मात्र भारताची कर्णधार आणि गोलरक्षक सविता पुनियाने तो प्रयत्न यशस्वी होऊ न देत चांगली कामगिरी केली. पहिला सत्रात भरपूर घडामोडी पाहायला मिळाल्या, पण एकही गोल न होता हे सत्र संपले.
दुसऱ्या सत्राची सुऊवात भारताला पेनल्टी कॉर्नर मिळून झाली, पण त्याचे ऊपांतर झाले नाही. 20 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाने दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळविला, पण त्याचेही रूपांतर करण्यात त्यांना अपयश आले. दोन्ही संघांनी एकमेकांच्या गोलक्षेत्रात भरपूर वेळा प्रवेश केला, पण दुसरे सत्रही गोलाविना संपुष्टात आले. भारताने तिसऱ्या सत्रामध्ये त्यांच्या खेळात एक नवीन तीव्रता आणली आणि पेनल्टी कॉर्नरवर कटारियाने झेपावत नोंदविलेल्या अप्रतिम गोलमुळे कोंडी सुटून त्या तीव्रतेचे बक्षीसही त्यांना मिळाले. तिसऱ्या सत्रामध्ये भारतीयांचे नियंत्रण राहिले आणि चौथ्या सत्रात तगडा बचाव करत बरोबरी साधण्याचे पाहुण्यांचे प्रयत्न त्यांनी उधळवून लावले.