न्युझीलंडमध्ये खलिस्तान समर्थकांची आगळीक
कथित जनमतचाचणीचे आयोजन : स्थानिकांचा विरोध
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
कॅनडानंतर आता खलिस्तान समर्थकांनी भारतविरोधी अजेंडा फैलावण्यासाठी न्युझीलंडची निवड केली आहे. प्रतिबंधित दहशतवादी संघटना शिख फॉर जस्टिने 17 नोव्हेंबर रोजी न्युझीलंडमध्ये खलिस्तान जनमत चाचणीचे आयोजन करविले आहे. यादरम्यान खलिस्तान समर्थकांनी भारतविरोधात जोरदार घोषणाबाजी करत खलिस्तानचा झेंडा फडकविला आहे. परंतु खलिस्तान समर्थकंच्या या कृत्यामुळे न्युझीलंडचे स्थानिक लोक नाराज झाले आहेत.
खलिस्तान समर्थकांच्या निदर्शनांना न्युझीलंडच्या लोकांनी विरोध केला आहे. ज्या ठिकाणी कथित जनमत चाचणीचे आयोजन केले जात होते, तेथे एका न्युझीलंडच्या नागरिकाने माइक हातात घेत स्वत:चा विरोध दर्शविला आहे.
न्युझीलंडच्या नागरिकाने खलिस्तान समर्थकांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांना देश सोडून जाण्यास सांगितले. आमच्या देशात हा ध्वज फडकविण्याची तुमची हिंमत कशी झाली अशी विचारणा करत या नागरिकाने खलिस्तान समर्थकांना स्वत:चा विदेशी अजेंडा माझ्या देशात आणू नका असे सुनावले आहे.
न्युझीलंडमध्ये याल आणि स्वत:चा झेंडा फडकवाल असा विचार करत असाल तर आमच्या देशात तुमचे स्वागत नाही. आमच्या येथे केवळ रेड, व्हाइट आणि ब्ल्यू फ्लॅग फडकविला जातो, जो न्युझीलंडचा ध्वज आहे. खलिस्तान समर्थकांनी स्वत:च्या देशात निघून जावे असे या नागरिकाने म्हटले आहे.
जयशंकर यांनी दर्शविला होता विरोध
न्युझीलंडमध्ये खलिस्तान समर्थकांच्या जनमत चाचणीमुळे भारत आणि न्युझीलंडच्या संबंधांवर प्रभाव पडू शकतो असे म्हणत विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी तेथील विदेशमंत्री विन्स्टन पीटर्स यांना खलिस्तान समर्थकांना व्यासपीठ न पुरविण्याचे आवाहन केले होते. 6 नोव्हेंबर रोजी जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या कॅनबरामध्ये रायसीना डाउन अंडर संमेलनादरम्यान पीटर्स यांच्याशी चर्चा केली होती. जयशंकर यांनी या बैठकीदरम्यान खलिस्तान समर्थकांच्या कारवायांबद्दल चर्चा केली होती.