पॅरा ऑलिम्पिक पदक विजेत्या बॅडमिंटनपटूंसाठी बक्षिसे जाहीर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गेल्या महिन्यात झालेल्या पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या भारतीय पॅरा बॅडमिंटनपटूंना अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेतर्फे मंगळवारी रोख 50 लाख रुपयांची बक्षीसे जाहीर करण्यात आली आहेत.
या स्पर्धेत भारताच्या 5 पॅरा बॅडमिंटनपटूंनी 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कास्य अशी एकूण 5 पदके मिळविली. पुरूषांच्या एकेरीत एसएल3 विभागात नितीशकुमारने सुवर्ण मिळविले असून त्याला 15 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. पुरूष एकेरीत एसएल-4 मधील रौप्य पदक विजेता सुहास यथीराज तसेच महिलांच्या एसयु-5 एकेरीतील रौप्य पदक विजेती तुलशीमती मुरगुसेन यांना प्रत्येकी 10 लाख रुपये, महिला एकेरी एसयु-5 तसेच महिला एकेरी एसएच-6 मधील कास्यपदक विजेत्या मनीषा रामदास आणि नित्या श्रीशिवन यांना प्रत्येकी 7.5 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. सदर माहिती अखिल भारतीय बॅडमिंटन फेडरेशनचे सरचिटणीस संजय मिश्रा यांनी दिली.