लोकमान्य सोसायटीच्या आकाशकंदील स्पर्धेचे बक्षीस वितरण
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने आयोजित आकाश कंदील स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना नुकतेच पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. एम. व्ही. हेरवाडकर स्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य सोसायटीचे संचालक गजानन धामणेकर होते. डॉ. किरण ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्य सोसायटीने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. आकाश कंदील स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपापले आकाश कंदील तयार करून प्रदर्शनात मांडले.
या स्पर्धेमध्ये जे. एन. भंडारी स्कूल ऑफ फाईन आर्ट्स, हॉबी सेंटर आरपीडी कॉलेज, मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज, एम. व्ही. हेरवाडकर इंग्लिश मीडियम स्कूल, ठळकवाडी हायस्कूल, स्वाध्याय विद्या मंदिर, व्ही. एम. शानभाग स्कूल, भंडारी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून किरण हणमशेट, सुनीता वेसणे यांनी काम पाहिले. या समारंभात प्राचार्या शोभा कुलकर्णी, प्रा. एम. बी. हुंदरे, प्रा. सुभाष देसाई, लता कणबरकर, सोमशेखर हुद्दार उपस्थित होते. लोकमान्य सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी राजु नाईक यांनी सूत्रसंचालन केले. टिळकवाडी परिसरातील महाविद्यालयीन शाळांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. कॉलेज विभागात प्रथम सुशांत हिरोजी, द्वितीय शिवम लोहार, तृतीय सत्यम सुतार, शालेय विभाग प्रथम सुमीत माने, द्वितीय तेजस सुतार, तृतीय सुदीप उपाध्ये यांनी पटकाविला. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते.