प्रियांका वड्रा यांनी भरला उमेदवारी अर्ज
वायनाड पोटनिवडणुकीसाठी उमेदवार : सोनिया गांधी, रॉबर्ट वड्रा, राहुल गांधी राहिले उपस्थित
वृत्तसंस्था/ वायनाड
काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा यांनी बुधवारी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. राहुल गांधी यांनी वायनाडच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने हा मतदारसंघ रिक्त झाला होता. उमेदवारी अर्ज भरताना प्रियांका यांच्यासोबत सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पती रॉबर्ट वड्रा यांच्यासमवेत अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी प्रियांका वड्रा यांनी वायनाडमध्ये रोड शो केला, ज्यात मोठ्या संख्येत लोकांनी भाग घेतला होता.
या रोड शोमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी सामील झाले. रोड शोनंतर प्रियांका वड्रा यांनी जाहीर सभेला संबोधित केले. मागील 35 वर्षांपासून वेगवेगळ्या निवडणुकींसाठी प्रचार करत आहे. आता पहिल्यांदाच मी जनतेच्या समर्थनाची मागणी स्वत:साठी करत आहे. ही एक वेगळीच भावना आहे. वायनाड मतदारसंघासाठी उमेदवारी दिल्याबद्दल मी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांची अत्यंत आभारी असल्याचे उद्गार प्रियांका वड्रा यांनी काढले आहेत.
17 वर्षे वय असताना मी पहिल्यांदा 1989 च्या निवडणुकीत स्वत:च्या वडिलांसाठी प्रचार केला होता. आता 35 वर्षे झाली आहेत. या कालावधीत मी स्वत:ची आई आणि भावासाठी प्रचार केला आहे. तर पहिल्यांदाच स्वत:साठी प्रचार करत असल्याचे वड्रा यांनी नमूद पेले आहे.
वायनाडमध्ये आता दोन खासदार
जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी आता वायनाड हा मतदारसंघ ठरेल जेथून दोन खासदार असतील, एक अधिकृत खासदार आणि दुसरा अनौपचारिक खासदार असे म्हटले आहे. या जाहीर सभेला इंडियन युयिन मुस्लीम लीगचे सर्वोच्च नेते सैयद सादिक अली शिहाब थंगल, राज्य काँग्रेस अध्यक्ष के. सुधाकरन आणि अन्य नेते उपस्थित होते.
सक्रीय राजकारणात प्रियांका वड्रा
निवडणूक आयोगाकडून वायनाड पोटनिवडणुकीची घोषणा होताच काँग्रेसने प्रियांका वड्रा यांची उमेदवारी जाहीर केली होती. काँग्रेसकडून वायनाड मतदारसंघात अखिल भारतीय काँग्रेस समिती महासचिवाला मैदाना उतरविण्यात आल्यावर पक्ष कार्यकर्त्यांनी मतदारसंघात पोस्टर्स लावली होती, ज्यावर ‘वायनाडिंते प्रियांकरी (वायनाडच्या प्रिय)’ असे नमूद होते. मागील आठवड्यात निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आणि प्रियांका वड्रा यांच्यासाठी केरळच्या या मतदारसंघातून निवडणुकीच्या राजकारणासाठी व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. तेथून त्या सक्रीय राजकारणात सामील होण्यास तयार आहेत.
भाजपकडून आव्हान
2024 च्या लोकसभा निवडणुकीत दोन मतदारसंघांमध्ये विजय मिळविल्यावर राहुल गांधी यांनी रायबरेली हा मतदारसंघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे वायनाड मतदारसंघ रिक्त झाला आणि पोटनिवडणूक घ्यावी लागली. भाजपने वायनाड मतदारसंघात प्रियांका वड्रा यांच्या विरोधात नव्या हरिदास यांना उमेदवारी दिली आहे. पेशाने मॅकेनिकल इंजिनियर असलेल्या नव्या यांनी 2007 मध्ये बीटेकचे शिक्षण पूर्ण केले होते. नव्या या सध्या कोझिकोड महापालिकेत नगरसेविका ओत. तसेच भाजप महिला मोर्चाच्या राज्य महासचिव म्हणून देखील त्या कार्यरत आहेत.