बायोपिकमध्ये झळकणार प्रियांका
वाराणसीनंतर मिळाला आणखी एक चित्रपट
प्रियांका चोप्रा सुमारे 6 वर्षांनी एस.एस. राजामौली यांच्याकडून दिग्दर्शित ‘वाराणसी“ चित्रपटातून भारतीय चित्रपटसृष्टीत परतणार आहे. यात महेशबाबू मुख्य नायक असणार आहे. तर दुसरीकडे प्रियांका चोप्रा आता एका मोठ्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. प्रियांका ही अमृता शेरगिल यांच्या बायोपिकचा हिस्सा ठरणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘अमरी“ असेल. भारत आणि हंगेरीचे नागरिकत्व बाळगणाऱ्या अमृता शेरगिल विसाव्या शतकाच्या प्रारंभी सर्वात प्रख्यात चित्रकारांपैकी एक होत्या. मीरा नायर यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या या चित्रपटात प्रियांका मुख्य भूमिकेत नसली तरीही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत दिसून येणार आहे.
मीरा नायर यांची हा चित्रपट भारतासोबत हंगेरी आणि फ्रान्समध्ये मोठ्या स्तरावर प्रदर्शित करण्याची योजना आहे. अमरी या चित्रपटात प्रियांकाने काम करावे अशी मीरा नायर यांचा आग्रह होता. याचमुळे त्यांनी मागील वर्षी प्रियांकाशी संपर्क साधला होता. प्रियांकाने काही दिवसांपूर्वी अमृतसरमध्ये स्वत:च्या हिस्स्याचे चित्रिकरणही केले आहे. या चित्रपटात तान्या मानिकतला मुख्य भूमिकेत आहे.
हा चित्रपट मीरा नायर आणि प्रियांका यांचा पहिला एकत्रित चित्रपट आहे. प्रियांका ही हॉलिवूड आणि बॉलिवूड दोन्ही ठिकाणी सक्रीय आहे, त्याचप्रमाणे मीरा नायर एक इंडियन-अमेरिकन फिल्ममेकर आहे.