‘वाराणसी’तील प्रियांका, महेशबाबूचा लुक समोर
राजामौली यांचा चित्रपट
बॉलिवूड तसेच हॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करणारी प्रियांका चोप्रा लवकरच भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन करताना दिसून येणार आहे. दक्षिणेतील दिग्गज दिग्दर्शक एस.एस. राजामौली आणि अभिनेता महेश बाबू यांचा आगामी चित्रपट ‘वाराणसी’त ती मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातील महेश बाबू आणि प्रियांका चोप्राचा फर्स्ट लुक सादर करण्यात आला आहे. यात प्रियांका चोप्रा ही अॅक्शन अवतारात दिसून येत आहे.
राजामौली यांच्या चित्रपटाद्वारे प्रियांका चोप्रा भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. पोस्टरमध्ये प्रियांका पिवळी साडी आणि हातात बंदुक धरून अॅक्शन अवतारात दिसून आली आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा ही मंदाकिनी नावाची भूमिका साकारत आहे. तर महेश बाबू हा पोस्टरमध्ये एका बैलावर स्वार होत येत असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटात मल्याळी अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन देखील मुख्य भूमिकेत आहे. एक नवा काळ सुरू होईल आणि मी भारतीय चित्रपटसृष्टीत परतेन, अशी अपेक्षा आहे. हा नवा प्रवास अविश्वसनीय असेल हे मला ठाऊक आहे असे उद्गार प्रियांका चोप्राने काढले आहेत. वाराणसी हा चित्रपट पुढील वर्षी जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.