For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रियांका जारकीहोळी यांचा अथणी येथे रोड शो

10:56 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रियांका जारकीहोळी यांचा अथणी येथे रोड शो
Advertisement

विजयी करण्याचे मतदारांना आवाहन

Advertisement

बेळगाव : चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी अथणी विधानसभा मतदारसंघात अथणी येथे माजी उपमुख्यमंत्री आमदार लक्ष्मण सवदी यांच्या नेतृत्वामध्ये भव्य रोड शो करून मतदारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी रोड शोमध्ये सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. अथणी येथे आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन प्रियांका जारकीहोळी यांना विजयी करण्याच्या घोषणा दिल्या. दुचाकी वाहनांसह सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी मोठा पाठिंबा दर्शविला. रोड शो प्रारंभ करण्यापूर्वी येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान गच्चीनमठ येथे भेट देऊन आशीर्वाद घेतला. शहरातील बसवेश्वर आणि संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्यांना पुष्प अर्पण करण्यात आले. राज्यात सरकारकडून जनहिताच्या योजना राबवून गरिबांचे कल्याण साधले जात आहे. यासाठी मतदारांनी काँग्रेसला पाठिंबा देऊन उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन आमदार लक्ष्मण सवदी यांनी केले. या भागाच्या विकासासाठी सरकारकडून पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह गोरगरिबांचे हित साधले जाणार आहे. केंद्रामध्ये सरकार आल्यास जाहीर करण्यात आलेल्या गॅरंटी योजनांचा लाभ करून दिला जाईल, असे सांगण्यात आले. आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये केपीसीसी सदस्य दिग्विजय पवार-देसाई, काँग्रेस नेते गजानन मंगसोळी, चिदानंद सवदी, रमेश सिंदगी, सदाशिव बोटाळे व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.