साय-फाय अॅक्शन थ्रिलरमध्ये प्रियांका
‘ब्ल्यूफ्लाय’ चित्रपटाची घोषणा
प्रियांका चोप्रा हॉलिवूडची मोठी स्टार झाली आहे. बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केल्यावर तिने आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये काम केले आणि आता ही ‘देसी गर्ल’ विदेशी चित्रपटांमध्ये यशाची पताका फडकवत आहेत. प्रियांकाच्या नव्या चित्रपटाची आता घोषणा झाली आहे. द ब्लफ आणि हेड्स ऑफ स्टेटनंतर प्रियांकाने आगामी साय-फाय अॅक्शन थ्रिलर ‘ब्ल्यूफ्लाय’ चित्रपटासाठी करार केला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ऑस्कर विजेता अभिनेता रसेल क्रो मुख्य भूमिकेत असणार आहे.
प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत या चित्रपटाविषयी माहिती दिली आहे. ब्ल्यूफ्लाय या चित्रपटाचे दिग्दर्शन निम्रोद एंटल करणार आहे. तर चित्रपटाची कहाणी डेव्हिड फ्रिगेरियोश विलियम यूबँक आणि कार्लाइल यूबँक यांनी लिहिली आहे.
बॅक-टू-बॅक हॉलिवूडपटांदरम्यान प्रियांका ही भारतीय चित्रपटसृष्टीतही पुनरागमन करत आहे. एस.एस. राजामौली यांचा चित्रपट ‘वाराणसी’द्वारे ती भारतीय चित्रपटसृष्टीत कमबॅक करणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण सध्या सुरु आहे. या चित्रपटात ती महेशबाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारत आहे. चित्रपटातील तिचा लुकही समोर आला असून त्याला चाहत्यांची पसंतीही लाभली आहे.
