प्रियांका गोस्वामीचे मोसमातील पहिले विजेतेपद
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2025 च्या अॅथलेटिक हंगामात भारताची महिला धावपटू प्रियांका गोस्वामीने पहिले विजेतेपद मिळविले आहे. ऑस्ट्रियातील स्पर्धेत तिने महिलांची 10 कि.मी. चालण्याची शर्यत जिंकली.
इन्सब्रुक येथे झालेल्या या स्पर्धेत प्रियांका गोस्वामीने महिलांच्या 10 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत 47 मिनिटे, 54 सेकंदांचा अवधी घेत विजेतेपद मिळविले. प्रियांकाने महिलांच्या 20 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत यापूर्वी 1 तास 28 मिनिटे 45 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम नोंदविला आहे तर 10 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत तिने 2022 साली 45 मिनिटे 47 सेकंदांची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी केली होती. मे महिन्यात मेलबर्न येथे झालेल्या व्हिक्टोरिया वॉकिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत गोस्वामीने दुसरे स्थान मिळविले होते. ऑस्ट्रियन रेस वॉकिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरुषांच्या 35 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत भारताच्या संदीप कुमारने 2 तास, 38 मिनिटे, 45 सेकंदांचा अवधी घेत दुसरे स्थान मिळविले असून राम बाबूने तिसरे स्थान घेतले.