प्रियांका गांधी वायनाडमधून विक्रमी मताधिक्याने विजयी
राहुल गांधी यांचा विक्रम मोडला : पहिल्या निवडणुकीत बंपर विजय मिळवत ‘लोकसभेत एन्ट्री’
वृत्तसंस्था/ वायनाड
केरळमधील वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत सुमारे 4 लाखांहून अधिक मतांची आघाडी घेऊन प्रियांका गांधी यांनी आपला बंधू राहुल गांधी यांच्या विजयाच्या फरकाला मागे टाकले आहे. राहुल गांधी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 3,64,422 मतांनी विजय मिळवला होता. त्यावेळी राहुल गांधींनी एकूण 6,47,445 मते मिळवत मोठा विजय मिळवला. मात्र, आता प्रियांका गांधींनी 4,10,931 इतके मताधिक्य मिळवत एकूण 6,22,338 मते पारड्यात पाडून घेतली. सत्यान मोकेरी या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला 2,11,407 इतकी मते मिळाली आहेत. तर, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपच्या नव्या हरिदास यांना 1,09,939 मते प्राप्त झाली आहेत.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा या निवडणुकीच्या पदार्पणात त्यांचे भाऊ राहुल गांधी यांच्यापेक्षा खूप पुढे गेल्या आहेत. केरळमधील वायनाड पोटनिवडणूक त्यांनी 4 लाखांहून अधिक मतांनी जिंकली. यानंतर प्रियांका गांधी यांनी या विजयाबद्दल वायनाडच्या जनतेचे अभिनंदन केले. प्रियांका गांधी यांच्याविरोधात वायनाडमध्ये अन्य 15 उमेदवार रिंगणात होते. मात्र, या सर्व विरोधकांना चितपट करण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत.
प्रियांका गांधी यांनी ‘एक्स’वर ‘तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी तुमची खूप आभारी आहे’ असे मत व्यक्त केले आहे. ‘वायनाडमधील हा विजय खरोखरच तुमचा विजय वाटतो आणि तुम्ही ज्या व्यक्तीला तुमचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले आहे ती तुमच्या आशा आणि स्वप्ने समजून घेत आणि तुमच्यासाठी लढेल. संसदेत तुमचा आवाज होण्यासाठी मी उत्सुक आहे,’ असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मतविभागणी
विजयी
6,22,338 ( 4,10,931)
प्रियंका गांधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पराभूत
2,11,407 (-4,10,931)
सत्यन मोकेरी
भारतीय कम्युनिस्ट पक्ष
पराभूत
नव्या हरदास
भारतीय जनता पार्टी
1,09,939 (-5,12,399)