हाती संविधानाची प्रत घेत प्रियांका गांधी शपथबद्ध
संसदेत एन्ट्री : लोकसभा सदस्यत्वाची शपथ
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
केरळमधील वायनाडमधून निवडणूक जिंकल्यानंतर प्रियांका गांधी गुरुवारी पहिल्यांदाच लोकसभेत पोहोचल्या. संसदेत एन्ट्री केल्यानंतर त्यांना खासदार म्हणून शपथ देण्यात आली. त्यांनी हिंदीतून शपथ घेतली. यावेळी राहुलप्रमाणेच त्यांनीही हातात संविधानाची प्रत घेतली होती. प्रियांका गांधी यांच्यासोबत नांदेडच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले रवींद्र वसंतराव चव्हाण यांनीही शपथ घेतली. गांधी कुटुंबातील तीन सदस्य सध्या संसदेत पोहोचले आहेत. काँग्रेस पक्षाशी संबंधित गांधी घराण्यातील तीन सदस्य एकत्र संसद सदस्य होण्याची ही पहिलीच वेळ आहे. राहुल गांधी रायबरेलीमधून लोकसभेचे खासदार असून प्रियांका गांधी-वाड्रा वायनाडमधून निवडून आल्या आहेत. तर सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेच्या खासदार आहेत.
प्रियांका गांधी गुरुवारी संसदेत पोहोचल्यावर काँग्रेस नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. संसद भवनात प्रवेश करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी त्यांना थांबवत आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढला. संसदेतील आपल्या पहिल्या दिवशी प्रियांका गांधी यांनी केरळची प्रसिद्ध ‘कसावू’ साडी परिधान केली होती. राहुल आणि सोनिया यांच्यासोबत प्रियांकाचे पती रॉबर्ट वाड्रा हेदेखील संसदेत उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर प्रियांकाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खर्गे यांचे आशीर्वाद घेतले. तत्पूर्वी आई सोनिया गांधी यांचेही आशीर्वाद घेतले. ‘प्रियांका खासदारपदी निवडून आल्याबद्दल आम्ही सर्व खूप आनंदी आहोत. आजचा हा दिवस आमच्यासाठी अभिमानास्पद आहे’, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.