For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भूमी घोटाळा प्रकरणी प्रियांका गांधी आरोपी

07:00 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
भूमी घोटाळा प्रकरणी प्रियांका गांधी आरोपी
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

हरियाणातील फरीदाबाद येथील एका भूमी घोटाळ्याच्या संदर्भात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनाही आरोपी बनविण्यात आले आहे. हे प्रकरण प्रवर्तन निर्देशालयाकडून हाताळले जात आहे. या प्रकरणात त्यांचे पती रॉबर्ट वढ्रा हे देखील सहभागी असल्याचा आरोप निर्देशालयाने ठेवला आहे. 2006 मध्ये या आरोपींनी हरियाणातील फरीदाबाद जिल्ह्यात एका स्थानी मालमत्ता दलाल एच. एल. पहावा याच्याकडून भूखंड कमी किमतीला विकत घेतला. त्यानंतर 2010 मध्ये आवघ्या चार वर्षांमध्ये तो याच दलालाला खूप अधिक किमतीला विकला. या व्यवहारात सध्या भारताबाहेर पळून गेलेला शस्त्रास्त्र दलाल संजय भंडारी याचाही सहभाग आहे. भंडारी हा विदेशात, विशेषत: ब्रिटनमध्ये मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारात आहे. त्याच्या मध्यस्थीने प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वढ्रा यांनी हरियाणातील भूखंड घोटाळ्यात बेकायदेशीररित्या मिळविलेल्या प्रचंड रकमेतून ब्रिटनमध्ये मालमत्ता विकत घेतली, असा आरोप ईडीने ठेवला आहे. या प्रकरणात आतापर्यंत प्रियांका गांधींचे नाव नव्हते. तथापि, त्यांचाही या प्रकरणात हात असल्याचा आरोप आता ईडीकडून ठेवण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये खरेदी केलेल्या मालमत्तेचे नूतनीकरण रॉबर्ट वढ्रा यांनी केले. तसेच काही काळ त्यांनी तेथे वास्तव्यही केले, असा ईडीचा आरोप आहे.

भंडारीचे पलायन

Advertisement

2016 मधून संजय भंडारी याने भारतातून पलायन केले. त्याने ब्रिटनमध्ये आश्रय घेतल्याचे नंतर स्पष्ट झाले. त्यानंतर भारताने त्याचे प्रत्यार्पण करण्यासाठी ब्रिटनच्या न्यायालयात आवेदन सादर केले. ब्रिटिश सरकारनेही त्याच्या प्रत्यार्पणाला याच वर्षी जानेवारीत मान्यता दिली आहे. मात्र अद्याप प्रत्यार्पण झालेले नाही.

आणखी अनेकांचा सहभाग

या घोटाळ्यात आणखी अनेकांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. यात संयुक्त अरब अमिरातीत वास्तव्य असणाऱ्या चेरुवथूर चकुट्टी थंपी या मालमत्ता दलालाचाही सहभाग असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. थंपी सध्या जामिनावर बाहेर आहे. त्याला 2020 मध्ये अटक करण्यात आली होती. तो वढ्रा यांचा नजीकचा सहकारी आहे, असेही ईडीने आपल्या आरोपपत्रात स्पष्ट केले आहे. या प्रकरणात आता ईडीने नवे सुधारीत आरोपपत्रही न्यायालयात सादर केले आहे.

वढ्रा यांची चौकशी

या भूमी घोटाळा प्रकरणी ईडीने काही महिन्यांपूर्वी रॉबर्ट वढ्रा यांची चौकशी केली होती. त्यांच्याकडून काही कागदपत्रेही हस्तगत करण्यात आली होती, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, वढ्रा यांनी सर्व आरोप नाकारले आहेत. आता न्यायालयात या आरोपांच्या सत्यासत्यतेची पडताळणी होणार आहे.

Advertisement
Tags :

.